काळजी घ्या… उन्हाच्या झळांनी महाराष्ट्र होरपळणार, तापमानात होणार मोठी वाढ, वाचा हवामानाचा अंदाज…

पुणे : राज्यात पुढील काही दिवस बहुतांश भागात कोरडे हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच राज्यातील हवामानात मार्च महिन्याची सुरुवात होताच बदल जाणवू लागले आहे.

तसेच काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने दिलासा मिळाल्यानंतर आता पुन्हा उकाड्याने डोके वर काढले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभाग यांनी मोठा इशारा जारी केला असून, पुढील काही दिवस तापमानात वाढ होऊन उन्हाचा चटका अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कधी थंडी तर कधी उकाडा अशी विस्कळीत हवामानस्थिती पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात अनेक भागांत जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांकडून सरकारकडे नुकसानभरपाईची मागणी होत आहे.

मात्र, पावसाचा प्रभाव ओसरताच वातावरण पुन्हा कोरडे होऊ लागले असून उष्णतेत वाढ जाणवत आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज राज्यातील हवामानात चढउतार दिसून येतील, मात्र उकाड्याची तीव्रता वाढण्याची शक्यता जास्त आहे.
फेब्रुवारी महिन्यात आधी पावसाचे वातावरण आणि नंतर अचानक वाढलेली उष्णता, असा बदल वारंवार जाणवत होता. यंदा डिसेंबरमध्येच थोडीफार थंडी अनुभवायला मिळाली होती. 1 जानेवारी 2026 रोजी झालेल्या पावसानंतर राज्यातील थंडी जवळपास नाहीशी झाली असून, उत्तरेकडील भागांतही थंड हवामान कमी होत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
तापमानाच्या बाबतीत राज्यात मोठी तफावत दिसून आली आहे. निफाड (Niphad) येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली असून तेथे किमान तापमान 11.7 अंश सेल्सिअस इतके होते. दुसरीकडे, अमरावती (Amravati) येथे राज्यातील उच्चांकी तापमान नोंदवले गेले असून तेथे कमाल तापमान 36.8 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. या आकड्यांवरून राज्यातील हवामान किती अस्थिर आहे, हे स्पष्टपणे दिसून येते.