Baramati : RSS नेत्याचे मनोज जरांगे यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य, सकल मराठा समाज आक्रमक, बारामतीत महत्वाची बैठक…
Baramati : बारामतीतील ज्येष्ठ पत्रकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बारामती जिल्ह्याचे माजी संघचालक दिलीप शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात मत व्यक्त करताना मराठा आरक्षणातील आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी कथित वादग्रस्त वक्तव्य केल्याने सकल मराठा समाजाने नाराजी व्यक्त केली आहे.
तसेच दिलीप शिंदे यांची एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियात कालपासून व्हायरल झाली असून यामध्ये शिंदे यांनी मराठा आरक्षणाची वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये त्यांनी शरद पवार यांच्या काळापासून जर दाखले दिले असते, तर आज ही वेळ आली नसती, असे सांगताना मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी आक्षेपार्ह शब्द वापरला.
मनोज जरांगे पाटील यांचा बांडगुळ असा उल्लेख करत ते दुही पसरवत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे. या व्हिडिओ क्लिपवर राष्ट्रवादी जनरल युनियनचे नेते संतोष सातव यांचेही छायाचित्र आहे. Baramati
दरम्यान याप्रकरणी बारामतीतील भिगवण रस्त्यावरील जिजाऊ भवन येथे आज संध्याकाळी सकल मराठा समाजाच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे लाखो कुणबी नोंदी सापडल्या व त्यामुळे लाखो समाज बांधवांना नोकरी व शिक्षणामध्ये लाभ मिळाला आहे.
आरक्षणाचा लढा सुरू असताना, जो व्यक्ती आपल्या जीवाची पर्वा न करता समाजासाठी अहोरात्र लढत आहे. त्या व्यक्तीबद्दल जो अपशब्द वापरला गेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.