पुर्व हवेलीत बेकरी व्यवसायिका़चा नागरिकांच्या जिवाशी खेळ…राजधानी बेकरीतील केकमध्ये अळ्या तर इतर बेकरीमध्ये उंदराचा वावर, अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष…

लोणी काळभोर : पुर्व हवेलीतील कदमवाकवस्तीत ग्रामपंचायत हद्दीत बेकरी व्यवसायिका नागरिकांच्या जिवाशी खेळ खेळत असून मागील आठवड्यात कवडी माळवाडी परीसरांतील राजधानी बेकरीतील केकमध्ये अळ्या आढळून येतात आल्या होत्या. त्यानंतर इतर बेकरीमध्ये उंदरांच्या वावरासमवेत अस्वच्छता आढळून येत असून अन्न व औषध प्रशासनाचे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे सर्व प्रकार पाहता अन्न व औषध प्रशासन आरोग्यविषयक एखादी गंभीर घटना होण्याची वाट पाहत आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

गेल्या आठ दिवसांपूर्वी राजधानी बेकरीच्या केकमध्ये जिवंत अळ्या सापडल्या होत्या. ही घटना ताजी असतानाच , आता लोणी स्टेशन परिसरातील गुलिस्था बेकरीमध्ये उदारांचा मुक्त वावर आढळून आल्याने परिसरांत एकच खळबळ उडाली आहे. त्यातच अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचे नाटक करून राजधानी बेकरीवर नाममात्र दंड आकारून कोणतीही ठोस कारवाई न करता पुन्हा व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याविषयी प्रशासन किती गंभीर आहे. हे निदर्शनास येत आहे.
कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील पाण्याच्या टाकीसमोर गुलिस्था बेकरी आहे. या बेकरीमध्ये नागरिकांना सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास उंदीर फिरताना आढळून आला. तसेच फ्रीजच्या कोपऱ्यात त्याची विष्टा आढळून आली. या घटनेचा व्हिडीओ एका सजग नागरिकाने चित्रित केला आहे. याची माहिती लोणी काळभोर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी मेहबूब लुकडे व त्यांच्या सहकाऱ्यांना दिली. त्यानंतर आरोग्य विभागाचे पथक गुलिस्था बेकरीची पाहणी करण्यासाठी आले.

या ठिकाणी वैद्यकीय पथकाला अस्वच्छता आढळून आली. त्या ठिकाणी सर्व खाद्यपदार्थ अस्तव्यस्त पडलेले होते. तर अनेक पदार्थांची एक्सपायरी डेट संपली होती. बेकरीतील तयार पदार्थावर गलिच्छ व मळका कपडा टाकला होता. अन्नपदार्थ बनवणा-या कामगारांनी आरोग्याच्या संदर्भातील सर्व नियम धाब्यावर बसवले होते. तेथे सडलेले पाव, केक व तळण्यासाठी वापरलेले खराब झालेले तेल आढळून आले. तसेच भिंतीवर तंबाखू व गुटख्याच्या पिचकाऱ्या मारलेल्या दिसल्या. तर पदार्थ बनविण्यासाठी वापरण्यात येणारे धातूचे ट्रे सुद्धा अस्वच्छ होते.

बेकरी चालकाला वैद्यकीय पथकाने व्यवसाय करण्याचा परवाना मागितला. तो त्यांना दाखविता आला नसल्याने या बेकारीला व्यवसाय करण्याचा ग्रामपंचायतीचा कोणताही परवाना नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर वैद्यकीय पथकाने न्यू क्रॉन बेकरीची पाहणी केली असता तेथे माल तयार करण्यासाठी घरगुती सिलेंडर अनधिकृतपणे वापरत असल्याचे आढळून आले. या ठिकाणी पदार्थ झाकण्याचे कापड व हातरुमालाची दुर्गंधी पसरली होती. याही बेकरीची परिस्थिती गुलिस्था बेकरीप्रमाणेच अस्वच्छ होती. तर या बेकरीला अन्न व औषध प्रशासनाचा व ग्रामपंचायतीचा कुठलाही परवाना नव्हता. असे निदर्शनात आले.
येथील सर्वसामान्य नागरिक दुषित अथवा एक्सपायरी डेट संपलेल्या अन्न पदार्थाची तक्रार वेळोवेळी व्हिडीओ अथवा लेखी स्वरुपात तक्रारी करीत आहेत. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाला खडबडून जाग येते. आणि संबंधितांवर किरकोळ कारवाई होते. त्यामुळे तो आपला व्यवसाय सर्वसामान्य नागरिकांच्या जिवाची पर्वा न करता बिनधास्तपणे सुरू ठेवतो. अशा कारवाईमुळे नागरिकांच्या मनात अन्न व औषध प्रशासनाच्या विरोधात प्रचंड रोष आहे.
पूर्व हवेलीत सुमारे २०० पेक्षा अधिक बेकऱ्या आहेत. यातील काही अपवाद वगळता इतरांकडे व्यवसाय करण्याचे अधिकृत परवाने नाहीत. त्यामुळे या अनधिकृत बेकऱ्या कुणाच्या आशीर्वादाने चालतात? हा प्रश्न अनुत्तरित राहतो आहे. येथील परप्रांतीय कामगारांची वैयक्तिक आरोग्य तपासणी तसेच त्यांच्या भारतीय नागरिकत्व असलेल्या कागदपत्रांची पडताळणी होणे गरजेचे आहे. अशा अनधिकृत बेकरींवर प्रशासनाने कडक कारवाई करावी. अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील बेकरींमधील दुषित अन्न पदार्थ नागरिकांच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे नागरिकांनी बेकरी अथवा हॉटेलमधून अन्न पदार्थ खरेदी करताना तपासून घ्यावा. आरोग्य विभागाच्या वतीने सर्व बेकरींना स्वच्छतेच्या दृष्टीने तोंडी सूचना दिलेल्या आहेत. लवकरच लेखीही देण्यात येतील. त्यानंतर आठ दिवसानंतर पुन्हा बेकरींची तपासणी करण्यात येईल. यामध्ये दोषी आढळणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करून त्या कायमच्या बंद करण्यात येतील.
मेहबूब लुकडे (वैद्यकीय अधिकारी – प्राथमिक आरोग्य केंद्र, लोणी काळभोर)