कंगनाच्या ‘जनरेशन गटर’ वक्तव्यावर बाबा रामदेवांचा संताप; “शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? तरुणांना गटर म्हणणं म्हणजे बिघडलेल्या डोक्याचं लक्षण!”

नवी दिल्ली : खासदार आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्या ‘जनरेशन गटर’ या वक्तव्यावरून वाद अधिकच वाढला आहे. योगगुरू बाबा रामदेव यांनी कंगनाच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत देशातील तरुण पिढीला ‘गटर’ म्हणणे चुकीचे असल्याचे म्हटले. अशा प्रकारचे वक्तव्य विकृत मानसिकतेचे लक्षण असल्याचा थेट टोला त्यांनी लगावला.
कंगनाने अलीकडेच सोशल मीडियावर एक पोस्ट करत तरुण हिंदू महिलांच्या बदलत्या विचारसरणीवर भाष्य केले होते. स्वतंत्र जीवनशैली, करिअर आणि कुटुंबाच्या पारंपरिक चौकटीबाहेर घेतले जाणारे निर्णय यावर तिने टीका केली. पाश्चात्त्य विचारसरणीचे अनुकरण करणाऱ्या भारतीय महिलांच्या नव्या पिढीला तिने ‘जनरेशन गटर’ असे संबोधले. तिच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा आणि टीका सुरू झाली.

याच मुद्द्यावर बाबा रामदेव यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना कंगनाला सवाल केले. “तिची शैक्षणिक पात्रता काय आहे? बालपण कसं गेलं? तारुण्य कसं गेलं? पूर्वीची कामगिरी काय होती?” असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी कंगनाच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. कोणत्याही देशातील तरुणांना ‘गटर’ म्हणणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


रामदेव यांनी तरुण पिढीची बाजू घेताना समाजातील विविध घटकांचा उल्लेख केला. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, दलित, आदिवासी, वनवासी तसेच अनुसूचित जाती-जमातीतील तरुणांचा देशाच्या युवा शक्तीत समावेश होतो. आजची तरुण पिढी ही स्वतःमध्ये मोठी ताकद आहे आणि तिच्याकडे नकारात्मक पद्धतीने पाहता कामा नये, असे त्यांनी सांगितले.
कंगना रामदेव आणि योगाची प्रशंसा करत असल्याच्या मुद्द्यावरही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “ती माझ्या योगाची प्रशंसा करते म्हणून मी तिची चुकीची वक्तव्ये झाकावीत का?” असा सवाल त्यांनी केला. तसेच कंगनाच्या वक्तव्याची तिच्या पक्षातील सदस्यांनीही दखल घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, कंगनाच्या ‘जनरेशन गटर’ वक्तव्यावरून सुरू झालेला वाद आता आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावरील एका पोस्टपासून सुरू झालेल्या या चर्चेत आता बाबा रामदेव यांच्या थेट प्रतिक्रियेमुळे नव्या राजकीय आणि सामाजिक चर्चेला तोंड फुटले आहे.