आयुष कोमकर खून प्रकरण ; बंडू आंदेकरसह साथीदारांविरुद्ध ‘मकोका ‘, आरोपीच्या अनाधिकृत बांधकामावर चालणार हातोडा..

पुणे : पुण्यातील नाना पेठेत झालेल्या टोळीयुद्ध आणि कौटुंबिक वादातून उगम पावलेल्या आयुष कोमकर खून प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे.या खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडूअण्णा आंदेकर याच्यासह १३ साथीदारांविरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणारा आयुष हा बंडू आंदेकरचा नातू होता. माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष याचा आंदेकर टोळीने खून घडवून आणला. या प्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. खून प्रकरणात पसार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडूअण्णा राणोजी आंदेकर (वय ६४), आंदेकर याचा नातू तुषार वाडेकर (वय २४), स्वराज वाडेकर ( वय २१), विवाहित मुलगी वृंदावनी वाडेकर (वय ४०), तसेच अमन युसूफ पठाण उर्फ खान (वय २२, सर्व रा. नाना पेठ), सुजल मेरगू (वय २३) यांना बुलढाणा परिसरातून अटक करण्यात आली. कोमकर खून प्रकरणात आरोपी अमित पाटोळे (वय १९), यश पाटील (वय १९) यांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे. कृष्णराज उर्फ कृष्णा आंदेकर (वय ४०), शिवम आंदेकर (वय ३१), लक्ष्मी आंदेकर (वय ६०), अभिषेक आंदेकर (वय २१) शिवराज आंदेकर (वय २०, सर्व रा. नाना पेठ) हे पसार झाले आहेत.
दरम्यान कुख्यात आंदेकर टोळीने दहशतीच्या जोरावर ठिकठिकाणी बेकायदेशीरपणे बांधकामे, तांबेमारी केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून पुणे महापालिकेशी पत्रव्यवहार करण्यात येणार असून त्याद्वारे या अनधिकृत बांधकामावर लवकरच कारवाईचा बडगा उभारला जाणार आहे.
