खासदार सुप्रिया सुळेकडून 100 एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न ; कोणी केला आरोप?

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीच्या कथित जमीन गैरव्यवहाराचे प्रकरणाने खळबळ उडाली असतानाच आता पवार कुटुंबातील खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून बारामती तालुक्यातील 100 एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. अजित पवार यांनी अख्खी बारामती लुबाडली आहे. गोजुबावी म्हणून एक गाव आहे. या गावामध्ये 100 एकर जमीन आहे. ही जमीन हडप करण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळे यांच्याकडून चालू आहे. ही वतनी जमीन आहे,’ असा धक्कादायक आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे. तसेच बारामती तालुक्यात ही जमीन आहे. आगामी दोन-चार दिवसांत मी तिथे जाणार आहे. गोजुबावी या गावात जाऊन मी सत्याग्रह आंदोलन करणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली आहे. त्यांच्या या आरोपावर आता सुप्रिया सुळे काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

याआधी ऑफिस प्रॉपर्टीच्या मुद्द्यावरून अनेक नेत्यांनी राजीनामे दिलेले आहेत. यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार एकनाथ खडसे यांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे. अजित पवार यांच्या जमीन प्रकरणावर पडदा टाकला जाणार आहे. ते पार्थ पवार यांच्या कर्तृत्त्वावर किती वेळा पांघरून घालणार आहेत. पार्थ पवार यांच्याविरोधात आम्ही उपोषण आणि धरणे आंदोलन चालू करू, असा इशाराच लक्ष्मण हाके यांनी दिला आहे.

