व्हॉट्सॲप-इन्स्टाग्रामवरून तरुणांना जाळ्यात ओढले, खात्यात पैसे पाठवले; भट्टीच्या कटावर एटीएसचा मोठा घाव!

मुंबई : पाकिस्तानस्थित गँगस्टर व कथित दहशतवादी हँडलर शहजाद भट्टीच्या सोशल मीडिया नेटवर्कविरोधात महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) राज्यभर व्यापक कारवाई सुरू केली आहे. व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तरुणांशी संपर्क साधून त्यांचे विचारप्रक्षालन करण्याचा आणि त्यांना संशयास्पद कारवायांकडे वळवण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.

एटीएसच्या प्राथमिक तपासात काही तरुणांच्या बँक खात्यांमध्ये परदेशातून रक्कम जमा झाल्याचे समोर आले आहे. या पैशांचा उद्देश, त्यांचा स्रोत आणि त्यांचा संभाव्य वापर याबाबत तपास सुरू आहे. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले की, आतापर्यंत राज्यातील १५७ तरुण संशयाच्या कक्षेत आले असून, त्यापैकी १०० हून अधिक जणांची चौकशी करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर एटीएस युनिटने मराठवाड्यातील १५ संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यात छत्रपती संभाजीनगरमधील १०, धाराशिवमधील २, तसेच बीड व जालना येथील प्रत्येकी काही तरुणांचा समावेश आहे. त्यांच्या मोबाईल फोन, संगणक आणि इतर डिजिटल उपकरणांची फॉरेन्सिक तपासणी केली जात असून, भट्टीच्या कथित नेटवर्कशी संबंधित डिजिटल धागेदोरे शोधले जात आहेत.

भट्टीकडून भारतात कोणताही घातपात घडवण्याचा कट रचला गेला होता का, याचाही तपास सुरू आहे. एटीएस गेल्या अनेक दिवसांपासून या नेटवर्कवर पाळत ठेवून होती. अद्याप कोणालाही औपचारिक अटक करण्यात आलेली नसली, तरी चौकशीत थेट सहभाग किंवा बेकायदेशीर कृत्ये उघड झाल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पालकांनी मुलांच्या सोशल मीडिया वापरावर लक्ष ठेवावे आणि संशयास्पद हालचाली तातडीने पोलिसांना कळवाव्यात, असे आवाहन सुरक्षा यंत्रणांनी केले आहे.
