आठवलेंचा उद्धवजींना टोला! कोणत्याही कोर्टात गेले तरी न्याय मिळणार नाही…!
पुणे : राज्यातल्या सत्तासंघर्षावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मात्र हा सत्तासंघर्ष नाही, सत्ता शिंदे- फडणवीसांना मिळाली आहे, असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. उद्धव ठाकरेंना कुठल्याही कोर्टात न्याय मिळणार नाही, असेही आठवले म्हणाले आहेत.
रामदास आठवले पुण्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर भाष्य केले आहे. आठवले म्हणाले, हा सत्तासंघर्ष नाही. सत्ता शिंदे-फडणवीस यांना मिळाली आहे. निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. उद्धव ठाकरे आता कुठल्याही कोर्टात गेले तरी त्यांना न्याय मिळणार नाही. जनतेच्या दरबारात गेले तरीसुद्धा त्यांना न्याय मिळणार नाही.
न्याय आम्हालाच मिळेल. शिवसेना ही एकनाथ शिंदेंची आहे, ते ‘अॅक्टिव्ह’ मुख्यमंत्री आहेत. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीबद्दलही त्यांनी भाष्य केले आहे. या निवडणुकांमध्ये पैसे वाटल्याचा आरोप झाला, त्यावरही आठवले यांनी उत्तर दिले आहे. आठवले म्हणाले, ‘नियमभंग झाल्याची जी तक्रार आहे, त्यावर कारवाई होईल. मला खात्री आहे, दोन्ही ठिकाणी भाजपा निवडून येईल. पैसे वाटले गेले असतील तर पैसे वाटणे ही आमची संस्कृती नाही.’