वाशीमच्या पालकमंत्रीपदी क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची निवड, राज्य सरकारकडून अधिकृत घोषणा….

अकोला : वाशीम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जबाबदारी सोडल्यानंतर हे पद रिक्त होते.
सामान्य प्रशासन विभागाने २६ मार्चला शासन निर्णय निर्गमित करून वाशीम जिल्ह्याच्या नव्या पालकमंत्र्यांची निवड जाहीर केली. दत्तात्रय भरणे यांच्या निवडीनंतर इंदापूर मधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून शासन निर्णय क्रमांक जिपार्म-१३२४/प्र.क्र.४७/२.वका.-२. दि.१८.०१.२०२५, यामध्ये अंशतः बदल करुन मंत्री दत्तात्रय भरणे यांची वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री नियुक्ती करण्यात येत असल्याचे परिपत्रक बुधवारी (ता.२६) काढण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी काही दिवसांपूर्वी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रिक्त झालेल्या वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे इंदापूरचे आमदार क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांचे नाव आघाडीवर होते. आज त्यांना या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी घोषित करण्यात आले.
दरम्यान, दत्तात्रय भरणे यांनी यापूर्वी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहिले असून, त्यांच्या कार्यकाळात सोलापूर जिल्ह्यातील अनेक विकास कामे मार्गी लागली. वाशिम जिल्ह्यातही दत्तात्रय भरणे असेच काम करतील आणि तेथील विकासाचा अनुशेष भरून काढतील असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.