अशोक खरात प्रकरण तापलं; अत्याचार ते 70 कोटींचा घोटाळा उघड

नाशिक: महाराष्ट्रामध्ये अशोक खरात याचं प्रकरण दिवसेंदिवस भलतंच गंभीर होत चाललंय. सुरुवातीला धार्मिक कार्यक्रमांच्या नावाखाली लोकांना गंडा घातल्याच्या चर्चा होत्या, पण आता तपासात वेगळंच चित्र समोर आलंय. अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार केल्याचेही आरोप पुढे आलेत, त्यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे.

यानंतर आर्थिक घोटाळ्याचा मुद्दा पुढे आला. लोकांकडून आधार, पॅनसारखी कागदपत्रं घेऊन त्यांचा गैरवापर करत ‘घोस्ट’ आणि ‘बेनामी’ बँक खाती उघडल्याचं उघड झालं.
Enforcement Directorate (ईडी) च्या तपासात 2022 ते 2024 या काळात तब्बल 70 कोटी रुपयांचे संशयित व्यवहार झाल्याचं समोर आलंय. 100 पेक्षा जास्त प्रॉक्सी अकाऊंट्स, एकाच मोबाईल नंबरचा वापर आणि एकाच नॉमिनीमुळे हा सगळा प्रकार अधिकच संशयास्पद ठरतोय.

आता या प्रकरणात ईडीने प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर यांना चौकशीसाठी बोलावलंय. प्रतिभा या माजी महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या बहिण आहेत.

दरम्यान, प्रतिभा चाकणकर यांनी सगळे आरोप फेटाळत ही खाती बनावट असल्याचं सांगितलंय. अत्याचार आणि कोट्यवधींचा घोटाळा या दोन्ही गोष्टी एकाच प्रकरणात समोर आल्यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.