Arun Gawli : डॅडी कोणाला देणार साथ? सुटकेनंतर गवळीच्या स्वागतासाठी राजकीय पायघड्या? शिंदे-फडणवीस सरकार लागले कामाला…

Arun Gawli : कुख्यात गँगस्टार ‘डॅडी’ अर्थात अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश नागपूर खंडपीठाने महिन्याभरापूर्वी दिले आहे. त्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. लोकसभेच्या धामधुमीत ‘डॅडी’ बाहेर येणार म्हणून त्याच्या स्वागतासाठी राजकीय पायघड्या टाकल्या जात आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठने गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचा निर्णय दिला आहे. त्या निर्णयाला राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. त्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोह ही सुनावणी होणार आहे. गवळी सध्या नागपूर कारागृहात शिक्षा भोगत आहे.
न्यायालयाने सरकारला दिलेल्या मुदतीत सरकारकडून विरोध मागे घेतला जाईल आणि अरुण गवळीची सुटका होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. गवळी भाजपसोबत जाणार की शिवसेनेला साथ देणार याचे उत्तर सुटकेनंतरच मिळणार आहे.
वय झालेल्या आणि शरीराने अशक्त असलेल्या कैद्यांना मुदतपूर्व सोडण्यासाठी सरकारने लागू केलेल्या २०१६ मधील धोरणाचा आधार घेत गवळीने सुटकेची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केली आहे. Arun Gawli
शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी ऑगस्ट २०१२ मध्ये गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याप्रश्नी सरकारला दोन आठवड्यांत निर्णय घ्यावा असे न्यायालयाने सांगितले होते. ही मुदत संपली आहे.
गवळीसह इतर ११ जणांना २०१२ मध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली. चौदा वर्षे शिक्षा भोगली असून, ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे असल्यामुळे जन्मठेपेच्या शिक्षेतून सुटका करावी, अशा मागणीची याचिका गवळीने केली होती.
२००६ च्या माफी धोरणानुसार चौदा वर्षे प्रत्यक्ष कारावास भोगलेल्या, वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या जन्मठेपेच्या कैद्यांची प्रकृतीच्या कारणास्तव सुटका करण्याची तरतूद आहे. २०१५ च्या सुधारित धोरणानुसार त्याला विरोध करण्यात आला होता. मात्र २००६च्या धोरणाचा लाभ घेण्यापासून गवळीला वंचित ठेवता येणार नाही, असे मत न्यायालयाने मांडले होते.
भाजपकडून पायघड्या..
लोकसभा निकालाच्या आदल्या दिवशी आज सुनावणी होत आहे. या घटनेचा लाभ घेण्यासाठी राजकीय चढाओढ लागली आहे. गवळीच्या स्वागतासाठी भाजपने पायघड्या टाकल्याचे चित्र आहे. मुंबई दक्षिण मतदारसंघातून भाजपकडून इच्छुक असलेल्या राहुल नार्वेकर यांनी काही दिवसापूर्वी एका सभेत थेट गवळी कुटुंबालाच साकडे घातल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.