‘आता पुन्हा पावसाचा कहर?’ १८ राज्यांना अतिवृष्टीचा इशारा; महाराष्ट्रात पुढील आठवड्यात मान्सूनची दमदार पुनरागमनाची शक्यता


पुणे : जुलैच्या पहिल्या आठवड्यात देशभरात मुसळधार पाऊस झाल्यानंतर काही दिवस विश्रांती घेतलेल्या मान्सूनने पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) उत्तर, पूर्व आणि मध्य भारतासह देशातील १८ राज्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. काही भागांत विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि ताशी ६० ते ७० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आसाम, त्रिपुरा, कर्नाटक, केरळ आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये पुढील काही दिवसांत जोरदार पावसाची शक्यता आहे. पर्वतीय भागांमध्ये भूस्खलनाचा धोका वाढू शकतो. तसेच किनारी भागांतील मच्छीमारांनी समुद्रात जाणे टाळावे, असा इशाराही देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात १ ते ८ जुलैदरम्यान पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. पालघर, मुंबई, पुणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. गेल्या दोन दिवसांत पावसाने उघडीप दिल्याने अनेक भागांत तापमान वाढले असून मुंबईत ३२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मात्र, ही विश्रांती अल्पकाळाची ठरण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

पुढील आठवड्यात राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत असून विदर्भातील काही जिल्ह्यांत येत्या २४ तासांत जोरदार सरींची शक्यता आहे. प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवण्याचे निर्देश दिले असून नागरिकांनी अधिकृत हवामान बुलेटिनवर लक्ष ठेवावे, सुरक्षित ठिकाणी राहावे आणि कोणतीही अफवा न पसरवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!