पावसाला पुन्हा ब्रेक? ‘अल निनो’च्या संकटामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली; IMD चा मोठा अंदाज

पुणे : जून महिन्यात दडी मारलेल्या पावसाने जुलैच्या सुरुवातीला दमदार पुनरागमन करत राज्यातील अनेक भागांना दिलासा दिला. या पावसामुळे जूनमधील पावसाची तूटही काही प्रमाणात भरून निघाली. मात्र आता पुन्हा एकदा मान्सूनचा वेग कमी होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे.

हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, प्रशांत महासागरात सक्रिय होत असलेल्या ‘अल निनो’च्या प्रभावामुळे पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. 10 ते 15 जुलैदरम्यान महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीसह उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतात पावसाचे प्रमाण घटण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
अरबी समुद्रातील तसेच उत्तर भारतातील कमी दाबाचा पट्टा कमकुवत झाल्याने ढगांची निर्मिती कमी झाली असून, ही परिस्थिती 19 जुलैपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई आणि कोकणात मध्यम पावसाची शक्यता असली तरी राज्याच्या इतर भागात उष्णता वाढण्याचा अंदाज आहे.

मुंबईत पाच दिवसांत विक्रमी पाऊस
मुंबईत जूनमध्ये पावसाने ओढ दिली होती. मात्र जुलैच्या पहिल्या पाच दिवसांतच पावसाने जोरदार हजेरी लावत महिन्याच्या सरासरीपेक्षा अधिक पाऊस नोंदवला. सांताक्रूझ वेधशाळेत 899.2 मिमी तर कुलाबा वेधशाळेत 823.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

‘अल निनो’मुळे मान्सूनचा बदलला पॅटर्न
हवामान तज्ज्ञांच्या मते, अल निनोच्या प्रभावामुळे यंदा मान्सून सलग सक्रिय राहण्याऐवजी टप्प्याटप्प्याने पुढे सरकत आहे. काही दिवस मुसळधार पाऊस, त्यानंतर पावसाची विश्रांती आणि उष्णतेचा प्रभाव अशी स्थिती निर्माण होत आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.
विदर्भात पावसाची 18 टक्के तूट
विदर्भात सुरुवातीला चांगला पाऊस झाला होता. मात्र जुलैमध्ये पावसाने विश्रांती घेतल्याने अनेक भागांत पावसाची कमतरता जाणवत आहे. 1 जून ते 10 जुलैदरम्यान विदर्भात सरासरीच्या तुलनेत 18 टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे.
गडचिरोलीमध्ये 46 टक्के, भंडाऱ्यात 33 टक्के, वाशिममध्ये 26 टक्के, चंद्रपूरमध्ये 23 टक्के तर अमरावती, नागपूर, अकोला आणि यवतमाळमध्येही पावसाची तूट कायम आहे.
नागपूर जिल्ह्यात 1 जून ते 9 जुलैदरम्यान 237.2 मिमी पाऊस झाला असून, सरासरीच्या तुलनेत सुमारे 10 टक्के तूट आहे. पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास खरीप पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचे लक्ष मान्सूनच्या पुढील सक्रिय टप्प्याकडे लागले आहे.