पुणेकरांना महागाईचा आणखी एक फटका! खासगी बस आणि स्कूल बसचे दर वाढणार; किती रुपये मोजावे लागणार?

पुणे : वाढती महागाई आणि इंधनाच्या खर्चामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर ताण वाढत आहे. आता खासगी बस आणि कारने प्रवास करणाऱ्यांनाही अधिक पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे.

खासगी बस आणि कारच्या भाड्यात २० ते २५ टक्क्यांनी वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, आगामी नवीन शैक्षणिक वर्षापासून स्कूल बसच्या भाड्यातही वाढ प्रस्तावित आहे. यासंदर्भात परिवहन विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजन जुनवणे यांनी दिली.
खासगी बस आणि कारचा प्रवास महागणार?


पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या खर्चासह वाहनांची देखभाल, दुरुस्ती आणि इतर खर्चात वाढ झाल्याने बसमालक आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे प्रवासी वाहतुकीच्या दरात वाढ करण्याची मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.
लग्नसमारंभ, धार्मिक यात्रा, सहली, कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची वाहतूक तसेच शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी खासगी बस आणि कारचा वापर केला जातो. प्रस्तावित भाडेवाढ लागू झाल्यास या सेवांसाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागू शकतात.
पाच वर्षांनंतर भाडेवाढीची मागणी
गेल्या पाच वर्षांपासून खासगी बसच्या भाड्यात वाढ करण्यात आली नसल्याचे संघटनेने सांगितले. मात्र, या काळात वाहनांची देखभाल आणि दुरुस्ती, चालकांचे वेतन, आरटीओचे फिटनेस शुल्क आणि ई-चलनाचा खर्च वाढला आहे. याशिवाय वाहनांमध्ये सुरक्षाविषयक साधने बसवण्यासाठीही अतिरिक्त खर्च करावा लागत आहे.
खासगी बस आणि कारचालकांना शासनाकडून पुरेशा सुविधा मिळत नसल्याची तक्रारही संघटनेने केली आहे. वाढत्या खर्चाचा भार कमी करण्यासाठी भाडेवाढ आवश्यक असल्याची भूमिका संघटनेने मांडली आहे.
बसच्या प्रकारानुसार किती वाढ प्रस्तावित?
खासगी बसच्या प्रकारानुसार प्रतिकिलोमीटर भाड्यात वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे.
१७ सीटर बस: २३ रुपयांवरून २७ रुपये
२० सीटर बस: २५ रुपयांवरून ३० रुपये
३२ सीटर बस: ३३ रुपयांवरून ३८ रुपये
३५ सीटर बस: ३६ रुपयांवरून ४२ रुपये
४० सीटर बस: ४१ रुपयांवरून ४५ रुपये
४५ ते ४९ सीटर बस: ४५ रुपयांवरून ५५ रुपये
स्कूल बसचे भाडेही वाढण्याची शक्यता
नवीन शैक्षणिक वर्षापासून स्कूल बसच्या भाड्यातही वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. मात्र, प्रस्तावित दरवाढीला मंजुरी मिळाल्यानंतरच प्रत्यक्ष भाडेवाढ लागू होणार आहे.
त्यामुळे खासगी बस, कार आणि स्कूल बसच्या भाड्यात नेमकी किती वाढ होणार, याकडे प्रवासी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.
