लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; कोणाला भरावे लागणार पैसे, कोणाचे हप्ते थांबणार? जाणून घ्या सविस्तर


लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; कोणाला भरावे लागणार पैसे, कोणाचे हप्ते थांबणार? जाणून घ्या सविस्तर

मुंबई : राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी आता अधिक कठोर करण्यात येत आहे. योजनेचा लाभ केवळ पात्र महिलांनाच मिळावा आणि गैरप्रकारांना आळा बसावा, यासाठी प्रशासनाने ई-केवायसीच्या माध्यमातून तपासणी सुरू केली आहे.

या पडताळणीत सोलापूर जिल्ह्यात सरकारी सेवेशी संबंधित कुटुंबांतील लाभार्थी आणि काही पुरुषांनीही योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आल्याची माहिती आहे.

महिला व बालविकास विभागाच्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील १ हजार ९०७ लाभार्थी स्वतः किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य शासकीय सेवेत असल्याचे आढळले आहे. याशिवाय, ७८ पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. या प्रकरणांमध्ये संबंधित लाभार्थी योजनेच्या निकषांनुसार पात्र आहेत की नाहीत, याची पडताळणी केली जात आहे.

या संशयित लाभार्थ्यांची ६३ पानांची यादी महिला व बालविकास विभागाच्या सचिवांकडून सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आल्याचे वृत्त ‘साम’ पोर्टलने दिले आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्येही अशा प्रकारच्या संशयित लाभार्थ्यांची माहिती संबंधित प्रशासनाकडे पाठवण्यात आल्याचे सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे.

पडताळणीनंतरच वसुलीचा निर्णय

सध्या संशयित लाभार्थ्यांचा आर्थिक लाभ तात्पुरता थांबवण्यात आल्याची माहिती आहे. जिल्हा प्रशासनाकडून अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष पडताळणी केली जात आहे. केवळ संशय किंवा नोंदीच्या आधारे लाभार्थ्यांना अपात्र ठरवले जाणार नाही. अंतिम तपासणीत जे लाभार्थी योजनेच्या निकषांनुसार अपात्र ठरतील, त्यांच्याकडून यापूर्वी देण्यात आलेल्या आर्थिक मदतीची वसुली करण्याची कार्यवाही केली जाऊ शकते.

पात्र महिलांनाच लाभ मिळावा, यावर भर

महिलांचे आर्थिक स्वावलंबन वाढवणे, तसेच त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा घडवून आणणे हा ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा प्रमुख उद्देश आहे. या योजनेचा लाभ पात्र महिलांपर्यंतच पोहोचावा, यासाठी शासनाकडून लाभार्थ्यांची पडताळणी केली जात आहे. त्यामुळे संशयित लाभार्थ्यांच्या तपासणीनंतर प्रशासन कोणती कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!