पिंपरी-चिंचवड हादरलं! विषारी दारूने 22 बळी; प्रशासनाकडून 1 लाख रुपयांची मदत जाहीर…


पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी गावठी दारूमुळे झालेल्या मृत्यूंची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. या भीषण प्रकरणात मृतांचा आकडा आता 22 वर पोहोचला असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, उरळी कांचन आणि हडपसर परिसरात या विषारी दारूचे सेवन केल्यानंतर अनेक नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उरळी कांचन परिसरातील 32 वर्षीय रिक्षाचालक उमेश अवचर यांचाही खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दारू प्यायल्यानंतर त्यांना अंधत्व, मळमळ आणि उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झाला होता. काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. स्थानिक तपासात ही दारू राधेश्याम प्रजापती याने उरळी कांचन परिसरात तयार केल्याची माहिती समोर आली आहे. त्याच परिसरातील अड्ड्यावरून ही दारू विक्रीस गेल्याचेही निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून विषारी दारूचे लोण आता उरळी कांचनपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर राजकीय व सामाजिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेनेच्या वतीने पुण्यात विविध भागात सुरू असलेल्या अवैध दारूभट्ट्यांवर धडक कारवाई करत त्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनीही या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त करत फुगेवाडी परिसरात मागील अनेक वर्षांपासून अवैध दारू व्यवसाय सुरू असल्याचा आरोप केला आहे. नागरिकांच्या तक्रारी असूनही कारवाई का झाली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणातील मृतांच्या नातेवाईकांसाठी मदत जाहीर केली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. महापौर रवी लांडगे यांनी ही माहिती दिली असून राज्य सरकारनेही अतिरिक्त मदत जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

पोलिस आणि प्रशासनाकडून राज्यभरात अवैध दारू निर्मिती आणि विक्रीविरोधात विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी छापेमारी करत अड्डे उद्ध्वस्त केले जात आहेत. मात्र, या संपूर्ण घटनेमुळे अवैध दारू साखळी आणि प्रशासनाच्या यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!