Amol Kirtikar : राजकीय वर्तुळात खळबळ! ठाकरे गटाच्या लोकसभा उमेदवाराला मोठा धक्का, उमेदवारी जाहीर होताच ईडीने…

Amol Kirtikar : राज्याच्या राजकारणात अनेक घडताना दिसत आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.
ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर यांना ईडीने समन्स बजावले आहे. मुंबई महापालिकेतील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी हे समन्स बजावण्यात आलं आहे. चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहावे, असे या समन्समध्ये नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे विरोधक आक्रमक होऊन सत्ताधारी भाजपला धारेवर धरण्याची शक्यता आहे. अमोल कीर्तिकर हे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार आहेत. त्यांची या भागात मोठी ताकद आहे. अशातच त्यांना ईडीचे समन्स आल्याने ठाकरे गटाचे टेन्शन वाढले आहे
नेमकं प्रकरण काय?
राज्यात कोरोनाचे संकट असताना लॉकडाऊन काळात मुंबईतील स्थलांतरित मजुरांना २५ लाख खिचडी पॅकेट पुरवण्यात आले होते. ठाकरे गटाच्या नेत्यांनी हे पॅकेट पुरवण्याचे कंत्राट मिळवले होते. यात १६० कोटींचा खिचडी घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमैया यांनी केला होता.
या प्रकरणात माजी मंत्री अनिल परब, माजी मंत्री रविंद्र वायकर यांची देखील चौकशी झाली होती. तर आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांची काही दिवसांपूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून देखील चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर सूरज चव्हाण यांना अटकही करण्यात आली होती. आता या प्रकरणात अमोल कीर्तिकर यांना ईडीचे समन्स आलं आहे. Amol Kirtikar
दरम्यान, लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे. तसतसे ईडीच्या कारवायाचे सत्र देखील वाढले आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देखील ईडीने अटक केली होती. यावरून विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. त्यातच आता ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर यांना देखील ईडीने समन्स बजावली आहे.