शेतकरी पुन्हा संकटात, शेतीसोबत आता दुग्धव्यवसाय देखील धोक्यात, काय आहेत कारणं.?
अहमदनगर : पाऊस लांबल्याने तीव्र चारा टंचाई निर्माण झाली असून पशुपालक शेतकरी अडचणीत आले आहेत. गतवर्षी साठवलेला सुका चारा संपत आला असून, आसपासच्या परिसरात चारा शोधण्यासाठी पशुपालक धडपडत असल्याचे दिसत आहे. मात्र चारा उपलब्ध होत नसल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
सर्वात धक्कादायक म्हणजे चारा टंचाई निर्माण झाल्याने दूध व्यवसाय धोक्यात आला आहे. एकीकडे चारा टंचाई तर दुसरीकडे कोसळलेल्या दुधाच्या दरांमुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट आले आहे.
शेतकरी वर्ग शेताच्या मेहनती पूर्ण करून पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा करू लागले आहेत. पावसाच्या जिवावर अवलंबून असणारे शेतकरी चिंतातुर आहेत. बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विहिरींनी तळ गाठला आहे. पावसाअभावी पिके करपू लागली आहेत. शेतीच्या पाण्याची मोठी कमतरता भासू लागली आहे
अहमदनगर जिल्ह्यातील गुंडेगाव या गावातील नागरिकांचा शेती आणि दूध व्यवसायावर उदर्निवाह चालतो. मागील दोन महिन्यापासून या गावाकडे पावसाने पाठ फिरवली आहे.
त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे चाऱ्याअभावी दररोज १२ ते १३ हजार लिटर संकलन होणाऱ्या दुधात एकूण 4 हजार लीटरने घट झाली आहे.
दरम्यान, मागील वर्षी या गावात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे चाऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. अशातच यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने चारा टंचाई निर्माण झाली आहे.
यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून जनावरांची खरेदी केली आहे. परंतु त्यांच्यावरच चारा टंचाईचे संकट निर्माण झाल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.