अखेर राहुल गांधी यांना खासदारकी बहाल, आज संसदेत लावणार हजेरी..

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधींना खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली आहे. मोदी आडनाव बदनामी प्रकरणात राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा झाली आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी गमवावी लागली होती.

आता सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधीच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर त्यांची संसदेतील सदस्यत्व बहाल करण्यासाठीचे कागदपत्र लोकसभा सचिवालयाकडून जारी करण्यात आले आहेत.
सर्व आवश्यक कागदपत्रांची लोकसभेच्या सचिवालयाकडून आज (सोमवारी) पडताळणी केली. त्यानंतर खासदारकीबदद्ल अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या लोकसभेच्या सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

दरम्यान मोदी सरकारच्या विरोधात मागचा अविश्वास प्रस्ताव आला होता. त्यावेळी भाषणानंतर राहुल गांधींनी मारलेली मिठी चांगलीच गाजली होती. आता यावेळी अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेत राहुल गांधी नसणार अशी चर्चा सुरु असतानाच सुप्रीम कोर्टाच्या निकालानं ती संधी उपलब्ध करुन दिलीय.
त्याआधीच सगळी प्रक्रिया पूर्ण होऊन त्यांना ही संधी पुन्हा दिली आहे. अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेत भाग घेतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.