अजित पवारांचा मास्टरप्लॅन ; शरद पवारांचे विश्वासू ‘घड्याळ’ बांधण्याच्या तयारीत

पुणे : दौंड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू असणारे रमेश थोरात हे लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवारांना मोठा धक्का बसणार आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यामध्ये कुल विरूद्ध थोरात असा संघर्ष आजपर्यंत पाहायला मिळाला आहे. मात्र राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार यांची साथ देत रमेश थोरात यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यासोबत मिळून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा प्रचार केला. मात्र विधानसभा निवडणूक जाहीर होताच रमेश थोरात यांनी पुन्हा एकदा शरद पवारांना साथ देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक लढवली. मात्र, या निवडणुकीत राहुल कुल यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर आता थोरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे.येत्या काही दिवसांमध्ये दौंड तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी एक मोठा मेळावा घेत अजित पवारांच्या उपस्थितीत रमेश थोरात यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीणमध्ये आपली ताकद निर्माण करू पाहणाऱ्या अजित पवारांनी थोरात यांना पक्षप्रवेशासाठी आग्रह धरला आहे. दुसरीकडे रमेश थोरात यांचे पुत्र तुषार थोरात हे पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. स्वतः रमेश थोरात यांना सुद्धा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे या दोन्ही निवडणुका पाहता थोरातंसाठी अजित पवारांचा पाठिंबा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. दरम्यान रमेश थोरात यांच्या या प्रवेशामुळे पुणे जिल्ह्यामध्ये शरद पवार यांच्या पक्षाला मोठा धक्का बसणार आहे.
