Ajit Pawar : लोकसभेच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले भविष्यातील चित्र…


Ajit Pawar : राष्ट्रवादीतून बंडखोरी करून अजित पवार यांनी थेट शरद पवार यांना आव्हान दिले होते. शरद पवार यांच्या बारामती येथून पत्नी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे करून शरद पवार यांच्या विरोधात दंड थोपटले होते.

महाराष्ट्रात महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा केवळ एक खासदार निवडून आला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने चार जागांवर निवडणूक लढवली होती. मात्र त्यापैकी एकाच जागेवर अजित पवार गटाला यश मिळालं. या पराभवानंतर अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अजित पवार गटासाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. मात्र या निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा मानहानिकारक पराभव झाला. दुसरीकडे धाराशिवमध्येही भाजपकडून जागा घेतल्यानंतर अजित पवार गटाने तिथे अर्चना पाटील याना उमेदवारी दिली होती. Ajit Pawar

मात्र त्यांचाही पराभव झाला. शिरुर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे यांना खुले आव्हान देऊन अजित पवार यांनी इशाराच दिला होता. मात्र तिथेही राष्ट्रवादीच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव झाला. रायगडमध्ये सुनील तटकरे यांच्या विजयाने राष्ट्रवादीला केवळ एकच जागा मिळाली आहे. या सगळ्यानंतर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार यांनी पोस्ट मध्ये म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीला मतदान केलेल्या समस्त मतदार बंधु-भगिनींचे आभार मानतो.

मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ‘एनडीए’नं बहुमताचा टप्पा गाठला, त्याबद्दल प्रधानमंत्री महोदयांचं आणि ‘एनडीए’च्या सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन करतो. ‘एनडीए’च्या विजयासाठी गेले काही महिने सातत्यानं परिश्रम घेतलेले सर्व नेते, कार्यकर्ते, हितचिंतक, मतदार बंधू-भगिनी सर्वांना धन्यवाद देतो.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकले नसले तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे. कुठलेही अपयश अंतिम नसतं. अपयशानं खचून न जाता नव्या उत्साहानं, उमेदीनं सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा स्वत:ला लोकसेवेला वाहून घ्यावं. असे पवार यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या नेत्यांकडून निकालाचं विश्लेषण केलं जाईल. त्यांच्या निष्कर्षाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी कामाला लागतील, असे लिहित पवार यांनी कार्यकर्त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!