“अजितदादा, तू कुठूनतरी अचानक येशील अन्…”; राखी पौर्णिमेला सुप्रिया सुळेंच्या पोस्टने वेधलं लक्ष


पुणे : राखी पौर्णिमा हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि नात्याचा सण. देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सामान्यांपासून सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांपर्यंत अनेकजण राखी पौर्णिमेच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. महाराष्ट्रातील पवार कुटुंबीयांचा राखी पौर्णिमेचा सणही दरवर्षी चर्चेत असतो.

मात्र यंदाची राखी पौर्णिमा पवार कुटुंबीयांसाठी भावनिक ठरली. दिवंगत अजित पवार यांच्या आठवणीने खासदार सुप्रिया सुळे भावुक झाल्या. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या भावाच्या आठवणींना उजाळा दिला.

सुप्रिया सुळे यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, “प्रिय दादा… आज राखी पौर्णिमा… पण यावेळी तू सोबत नाहीस, ही जाणीव मनाला खूप अस्वस्थ करत आहे. सात महिन्यांपूर्वीची ती भीषण सकाळ आणि तुझं अचानक निघून जाणं… यावर आजही विश्वास बसत नाही.”

लहानपणीच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी पुढे लिहिलं की, लहानपणापासून एकत्र वाढताना झालेली भांडणं, एकमेकांवरील प्रेम आणि एकमेकांविषयीचा अभिमान हाच त्यांच्या नात्याचा पाया होता.

“आजही वाटतं, तू कुठूनतरी अचानक येशील, राखी बांधून घेशील, बहिणींसोबत गप्पागोष्टी करत पुन्हा कुटुंबात रमून जाशील. तुझ्या नसण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणारी नाही. तू जिथे असशील, तिथून तुझं प्रेम आणि आशीर्वाद असेच सदैव पाठीशी राहू दे,” असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

या पोस्टनंतर सोशल मीडियावर अनेकांनी भावुक प्रतिक्रिया दिल्या. काही युजर्सनी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या भावाबहिणीच्या नात्याच्या आठवणींना उजाळा देत आपल्या भावना व्यक्त केल्या.

सुषमा अंधारेंनी उद्धव ठाकरेंना बांधली राखी

दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही रक्षाबंधनानिमित्त माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी लिहिलं, “महाराष्ट्रातल्या लेकीबाळींचा आत्मसन्मान राखण्यासाठी भाऊ म्हणून आपण आम्हाला कायम हवे आहात. सतत हसत रहा, तणावमुक्त राहा. आपलं हसतमुख असणं हाच विरोधकांसाठी जालीम उपाय आहे. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.”

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!