बुलढाणा जिल्हा बँकेत ‘अजितदादा फॅक्टर’ची एन्ट्री! १२ जागा बिनविरोध, उरलेल्या ९ जागांसाठी राष्ट्रवादी विरुद्ध सहकार पॅनल थेट सामना


बुलढाणा : बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र ताकद दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या २१ संचालकपदांपैकी १२ जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले असले, तरी या प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेसला स्थान मिळाले नाही. त्यामुळे उर्वरित ९ जागांसाठी आता राष्ट्रवादीने स्वतंत्र पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याची तयारी केली असून, आज २३ ऑगस्ट रोजी मतदान होत आहे.

राष्ट्रवादीच्या या भूमिकेमागे बँकेच्या आर्थिक अडचणींचाही संदर्भ दिला जात आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्हिडिओ संदेशातून या निवडणुकीबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, बुलढाणा जिल्ह्यातील अनेक मोठे नेते यापूर्वी आर्थिक मदतीसाठी अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत होते. शेतकऱ्यांची ही बँक आर्थिक संकटातून बाहेर यावी आणि तिला नवसंजीवनी मिळावी यासाठी अजित पवार यांनी ३०० कोटी रुपयांची मदत केली होती, असा दावा सुनेत्रा पवार यांनी केला.

या आर्थिक मदतीमुळे बँक अवसायनाच्या प्रक्रियेतून बाहेर आल्याचे पाहायला मिळाले, असेही त्यांनी नमूद केले. मात्र, त्यानंतरच्या निवडणूक प्रक्रियेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला ठेवण्यात आल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. ज्या बँकेला अजितदादांनी भरीव मदत केली, त्याच बँकेच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला सोबत न घेता इतर पक्षांना सोबत घेतले जात असल्याची खंत असल्याचे त्यांनी म्हटले.

सुनेत्रा पवार यांनी केवळ राजकीय आरोप न करता आपल्या प्रत्यक्ष अनुभवाचाही उल्लेख केला. नेते आर्थिक मदतीसाठी अजित पवार यांच्याकडे येत असत, त्यावेळी आपण अनेकदा त्यांच्यासोबत असल्याने हे प्रकार स्वतः ऐकले असल्याचे त्यांनी सांगितले.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून ‘स्व. अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल’ निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आले आहे. सिंदखेडराजाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोज कायंदे यांच्या पुढाकाराने या पॅनलची उभारणी करण्यात आली आहे. उर्वरित नऊ जागांवर या पॅनलची ‘सहकार पॅनल’सोबत थेट लढत होणार आहे.

त्यामुळे १२ जागांवरील बिनविरोध निवडीनंतर आता उरलेल्या ९ जागांचे मतदान निर्णायक ठरणार आहे. शेतकऱ्यांच्या बँकेवरील नियंत्रणासाठी सुरू झालेली ही निवडणूक आता राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची बनली असून, आजच्या मतदानानंतर कोणत्या पॅनलला मतदारांचा कौल मिळतो, याकडे बुलढाणा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!