लोकांनी पाडला ‘नोटांचा’ पाऊस तर पोलिसांनी ‘काठ्यांचा’ ! अहमदनगर जिल्ह्यात गौतमी पाटीलचा राडा …!

अहमदनगर : सध्या प्रसिद्धीच्या झोतात आलेली प्रसिध्द नृत्यांगना गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि राडा हे सूत्रच बनले आहे. यामुळे अनेक ठिकाणी मोठा गोंधळ बघायला मिळत आहे. अनेक ठिकाणी तिच्या कार्यक्रमासाठी लोकं लांबून येत आहेत. तसेच पोलिस संरक्षण असले तरी मोठा राडा होत आहे.
आता राहाता येथे वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मोठा राडा झाला असून हुल्लडबाजांना आवरण्यासाठी पोलिसांचा थेट लाठीचार्ज करावा लागला. या नंतर कार्यक्रम देखील बंद करण्यात आला. नंतर यातून गौतमीला बाहेर काढण्यात आले.
दरम्यान, याठिकाणी गौतमीचा डान्स सुरू होताच काही प्रेक्षकांनी गौतमीवर पैशांची उधळण सुरू केली. त्यामुळे गौतमीने नाराजी व्यक्त करत डान्स थांबवला आणि स्वतः माईक हातात घेत प्रेक्षकांना गोंधळ न करण्याची विनंती केली. पोलिसांनी हस्तक्षेप करत गर्दीला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही गोंधळ सुरूच राहिल्याने अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
यावेळी प्रेक्षकांची एकच धावपळ उडाली आणि आयोजकांना कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला. एवढे होऊनही काही प्रेक्षकांनी गौतमी पाटील गाडीत बसत असताना तिच्या गाडीला घेराव घालत गोंधळ घातला. मोठ्या बंदोबस्तात तिचा ताफा बाहेर काढण्यात आला. यावेळी पोलिसांची मोठी पळापळ झाली. यामुळे आता येणाऱ्या काळात गौतमी पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे.