तुर्कीमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के…!
3 जणांचा मृत्यू; 213 जण जखमी...

नवी दिल्ली : तुर्कीमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.3 मोजली गेली. युरोपीयन भूमध्य भूकंप विज्ञान केंद्र (EMSC) ने अहवाल दिला की तुर्की-सीरिया सीमा प्रदेशात दोन किमी (1.2 मैल) खोलीवर 6.3 तीव्रतेचा भूकंप झाला. तुर्कस्तानच्या दक्षिणेकडील हाते प्रांतात सोमवारी भूकंपाचे दोन धक्के जाणवले.
तुर्कीचे गृहमंत्री सुलेमान सोयलू यांनी सांगितले की, ताज्या भूकंपात तीन जणांचा मृत्यू झाला असून 213 जण जखमी झाले आहेत. भूकंपाच्या धक्क्यांमुळे लोक घराबाहेर पडले आणि सर्वत्र गोंधळ उडाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ताज्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे.
तुर्कस्तानच्या अनादोलू वृत्तसंस्थेनुसार, हाते प्रांतातील 6.4 आणि 5.8 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के शेजारील लेबनॉनची राजधानी बेरूतमध्येही जाणवले. तुर्की-सिरियन सीमेवर भूकंपानंतर अलेप्पोमध्ये इमारतीचा काही भाग कोसळल्याने सहा जण जखमी झाले, असे सीरियाच्या राज्य वृत्तसंस्थेने SANA ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
तुर्कीच्या आपत्ती एजन्सीने आपत्ती आणि आपत्कालीन व्यवस्थापन प्रेसीडेंसीच्या (एएफएडी) हवाल्याने सांगितले की, स्थानिक वेळेनुसार 20.04 वाजता हातायमध्ये 6.4 तीव्रतेचा भूकंप झाला, तर तीन मिनिटांनंतर 5.8 तीव्रतेचा दुसरा भूकंप झाला. केंद्र हातेमध्ये होते. समुद्राची पातळी वाढण्याचा धोका लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून किनारी भागात जाणे टाळण्याचे आवाहन एएफएडीने नागरिकांना केले आहे. समुद्र पातळी 50 सेमी (1.6 फूट) पर्यंत वाढू शकते म्हणून चेतावणी जारी करण्यात आली आहे. तुर्की चे उपाध्यक्ष फुआत ओकटे यांनी परिसरातील नागरिकांना नुकसान झालेल्या इमारतींपासून दूर राहण्याचे आवाहन केले.
यापूर्वी 6 फेब्रुवारीला तुर्कस्तान आणि शेजारील सीरियामध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.8 मोजली गेली. एक-दोन दिवसांनंतरही अनेक वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या 41,000 च्या पुढे गेली आहे. अशा स्थितीत पुन्हा एकदा या धक्क्याने चिंता वाढली आहे.