जालन्यातील लाठीमार घटनेनंतर गृहविभागात मोठ्या घडामोडी, पोलीस अधीक्षक तुषार जोशी सक्तीच्या रजेवर..
जालना : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून सध्या राज्यात वातावरण चांगकेच तापले आहे. जालन्यात मोठा राडा झाल्यानंतर सरकारवर टीका केली जात आहे. असे असताना जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना गृह विभागाने सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याची माहिती आहे.
याठिकाणी अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी शुक्रवारी लाठीमार केला होता. त्यानंतर राज्यभरात संतप्त पडसाद उमटले होते. यामुळे पोलीस यंत्रणेवर जोरदार टीका झाली.
जिल्हयातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. लाठीहल्ल्यानंतर झालेल्या दगरफेकीत ३२ पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले होते. तसेच अनेक नागरिक जखमी झाले होते.
राज्यात लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ ठिकठिकाणी रास्ता रोको व जाळपोळीचे प्रकार झाले. जिल्हयातील चार आगारातील २५० बसेस आगारात थांबून आहेत. यामुळे अनेकांची गैरसोय देखील झाली.
मराठा आंदोलकांचा पोलिसांवरील रोष लक्षात घेउन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यामुळे पुढे काय घटना घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.