अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांवर अजून एक मोठं संकट! आता शक्ती चक्रीवादळ महाराष्ट्राच्या वेशीवर, पुन्हा मुसळधार पाऊस पडणार…

पुणे : काही दिवसांपूर्वी मराठवाड्यासह राज्यात जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. अनेकांचे संसार उद्धवस्त झालं होते. तसेच या पावसामुळे शेतपिकांचंही मोठं नुकसान झालं होतं. या पावसामुळे जमीन खरडून निघाली होती.

त्यामुळे ही पिकं जमीनदोस्त झाली होती. मात्र, हे संकट दूर होत नाही तोच महाराष्ट्रावर आणखी एक संकट घोंगावतं आहे. हवामान विभागाने नुकताच राज्यातील काही जिल्ह्यांना ‘शक्ती’ चक्रीवादळाचा इशारा दिला आहे.
येत्या ७ ऑक्टोंबरपर्यंत शक्ती वादळ धडकण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे,पालघर, रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

अरबी समुद्रात ‘शक्ती’ चक्रीवादळ निर्माण होत असल्याने, येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि समुद्रातील खवळलेली परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्रासाठी धोका असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे.
या इशाऱ्यामुळे अनेक किनारी आणि अंतर्गत जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय केली आहे. समुद्राची स्थिती अतिशय खवळलेली असून, ५ ऑक्टोबरपर्यंत उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मासेमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
शक्ती चक्रीवादळ आणि हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर आता मच्छीमारांनी खोल समुद्रात जाणे टाळावं असं आवाहनही प्रशासनाकडून कऱण्यात आलं आहे. याशिवाय पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागातही मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात पावसाने हाहाकार माजवला आहे. या पावसात जवळपास १० जणांचा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मराठवाड्यात पावासामुळे सर्वाधिक नुकसान झालं आहे. बीड, धाराशिव, लातूर, जालना, सोलापूर या भागात पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे लाखो हेक्टर शेतपिकांचं नुकसान झालं आहे.
अशापरिस्थित ओला दुष्काळ जाहीर कऱण्याच्या मागणी केली जाते आहे. तसेच शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणीही जोर धरते आहे. या संकटातून शेतकरी अद्याप सावरलेला नाही. मात्र, आता राज्यावर चक्रीवादळाचे नवे संकट ओढावले आहे. त्यादृष्टीने सरकारकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात असल्याचं सांगण्यात येत आहे.