डिलिव्हरी देऊन बाथरूममध्ये गेला, बाहेर येताच गुप्तांग दाखवलं…महिलेने कॅमेऱ्यात कैद केला धक्कादायक प्रकार

बंगळुरू : बंगळुरूमधून महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील मुन्नेकोलाला परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये डिलिव्हरी देण्यासाठी आलेल्या एका तरुणावर महिलेने गंभीर आरोप केले आहेत. ऑर्डर पोहोचवल्यानंतर घरातील बाथरूम वापरण्याचा बहाणा करून त्याने प्रवेश मिळवला आणि त्यानंतर महिलेसोबत अश्लील वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. २२ वर्षीय विजय मल्लिकार्जुन कामत हा डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह एका ऑर्डरसाठी संबंधित महिलेच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचला होता. ऑर्डर दिल्यानंतर त्याने अचानक बाथरूम वापरण्याची इच्छा व्यक्त केली. महिलेच्या तक्रारीनुसार, त्याने बाथरूम वापरण्यासाठी आग्रह केला, त्यानंतर त्याला परवानगी देण्यात आली.
मात्र, बाथरूममधून बाहेर आल्यानंतर आरोपीने कथितरित्या महिलेसोबत अश्लील हावभाव करण्यास सुरुवात केली. महिलेच्या आरोपानुसार, त्याने तिच्यासमोर अश्लील कृत्य करत गुप्तांग दाखवले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे महिला धक्क्यात गेली, मात्र तिने प्रसंगावधान राखत आपल्या मोबाईल फोनमध्ये या घटनेचे रेकॉर्डिंग केले.

यानंतर महिलेने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही बाब मराठाहळ्ळी पोलिसांच्या निदर्शनास आली. पोलिसांनी स्वतःहून या प्रकरणाची दखल घेत महिलेचा संपर्क साधला आणि संपूर्ण घटनेची माहिती घेतली. त्यानंतर महिलेच्या औपचारिक तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी विजय मल्लिकार्जुन कामत याला अटक केली असून त्याच्याकडे चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा तपास गंभीरपणे सुरू असून, व्हायरल झालेला व्हिडिओ, घटनास्थळी उपलब्ध पुरावे आणि इतर संबंधित माहितीची पडताळणी केली जात आहे. आरोपीने यापूर्वी अशा प्रकारचे कोणते कृत्य केले आहे का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.
या घटनेनंतर घरपोच सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या गैरवर्तनाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. नागरिकांनी, विशेषतः महिलांनी, अनोळखी व्यक्तींना घरात प्रवेश देताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन केले जात आहे. दरम्यान, आरोपीविरोधातील पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून या प्रकरणातील सर्व बाजूंचा तपास केला जात आहे.