पिक विम्याच्या अग्रीम रक्कमेचे वाटप झाले सुरू ! एक रुपयांत शेतकऱ्यांना मिळणार नुकसान विमा ..!!
मुंबई : सध्या सणासुदीचे दिवस चालू आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पैशाची देखील गरज भासत आहे. अशातच आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यांमध्ये पंतप्रधान पिक विमा योजनेतील विम्याच्या अग्रीम रकमेचे वाटप सुरू झाले असल्याची माहिती मिळत आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
याबाबत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की आतापर्यंत राज्यात 47 लाख 63 हजार नुकसान भरपाई अर्जांना मंजुरी मिळाली असून १९५४ कोटी रुपये वाटप होणार आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत 965 कोटी रक्कम वितरित करण्यात आली असून उर्वरित रक्कम वितरणाचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती देखील धनंजय मुंडे यांनी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
खरीप हंगामातील नुकसानीसंदर्भात जवळपास 24 जिल्ह्यांसाठी अधिसूचना काढण्यात आली होती. यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये या अधिसूचनेवर विमा कंपन्यांचे कोणतेही आक्षेप नसून नऊ जिल्ह्यांमध्ये आक्षेप आहेत. राज्यस्तरावर बुलढाणा, वाशिम, बीड, नाशिक, धुळे, अहमदनगर, नंदुरबार, पुणे, अमरावती अशा नऊ जिल्ह्यांमध्ये पिक विमा कंपन्यांच्या आक्षेपावर अपील सुनावणी सुरू आहे.
राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी फक्त एक रुपयात पिक विमा दिला आहे. यामध्ये जवळपास एक कोटी सत्तर लाख 67 हजार अर्जदारांनी नोंदणी केली आहे. शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे देखील बोलले जात आहे.