कर्तव्यात कसूर ठेवल्याचा ठपका! खून प्रकरणी दोन पोलीस निलंबित, नेमकं काय घडलं?


सांगली : कामात कसूर केल्याचा ठपका ठेवत तासगाव पोलिस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांवर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. वायफळे येथील रोहित संजय फाळके याच्या खून प्रकरणातील मुख्य संशयित विशाल सज्जन फाळके याला पूर्वीच्या गुन्ह्यात वेळेवर वॉरंट न बजावल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

पोलिस हवालदार वेदकुमार धोंड व पोलिस कॉन्स्टेबल पवन जाधव अशी निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. मुख्य संशयित विशालवर तासगाव पोलिस ठाण्यात २०१५ मध्ये दाखल गुन्ह्यात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी वॉरंट बजाविले होते.

ते वॉरंट न बजाविता धोंड व जाधव यांनी पुन्हा न्यायालयात सादर केले होते. आणखी एका गुन्ह्यात २३ मार्च ते ५ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी पाचवेळा वॉरंट बजावले पण हे वॉरंट विशाल याला बजाविले नाही. दरम्यान, तो न्यायालयात हजर न राहिल्याने त्याचा व रोहित फाळके यांच्यातील वाद विकोपाला गेला.

हे वॉरंट विशाल याला पोहोच करण्यात धोंड व जाधव यांनी कसूर केल्याचा ठपका ठेवल्याची माहिती पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी दिली. अहवाल पोलिस अधीक्षक घुगे यांना देण्यात आला होता. अधीक्षक संदीप घुगे यांनी याची गंभीर दखल घेत दोन्ही पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!