अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आरती रविंद्र सकट यशस्वी; मुंबई पोलीसपदी निवड; पोलीस भरतीत १५० पैकी १२४ गुण मिळवले नेत्रदीपक यश

आरतीच्या यशाबद्दल पेढा भरून कौतुक करताना तिचे आई-वडील


लोणी काळभोर, ता. ३१ : हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथील गरीब कुटुंबातील कन्या कु. आरती रविंद्र सकट हिने जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर मुंबई पोलीस दलात यशस्वी निवड मिळवत प्रेरणादायी कामगिरी केली आहे. पोलीस भरती प्रक्रियेत १५० पैकी १२४ गुण मिळवत नेत्रदीपक यश संपादन केले आहे. आरतीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दुसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवले आहे. आहे. अत्यंत सामान्य परिस्थितीतून पुढे येत मिळवलेल्या या यशामुळे पंचक्रोशीतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आरतीचे आई-वडील दुसऱ्याच्या शेतात मजूरी तर लहान भाऊ टायरच्या दुकानात काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तर आरती हिने हडपसर येथील एस. एम. जोशी महाविद्यालयातून ग्रॅज्युएशन केलेनंतर एका रुग्णालयातील स्वागतकक्षात नोकरी करून कुटुंबाला आधार दिला. २०२३ पासून ती पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होती. वनविभागाच्या जागेत पत्र्याच्या खोलीत राहून कुटुंबाने आर्थिक अडचणी असूनही त्यांनी मुलीच्या शिक्षणात कोणतीही तडजोड केली नाही. त्यांच्या कष्टाला आणि आरतीच्या जिद्दीला अखेर यश मिळाले आहे.

विशेष म्हणजे कोणत्याही अकॅडमीचे सहकार्य न घेता, फक्त मोहम्मद शेख यांनी दिलेल्या मैदानावरील मार्गदर्शनाच्या जोरावर आरतीने रुग्णालयात काम करत असताना रुग्ण नसताना मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून स्वतःचे ज्ञान, मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर हे यश मिळवले आहे. तिच्या या यशामुळे परिसरातील विद्यार्थ्यांसपोर प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला असून, तिच्या जिद्दीचे आणि आई-वडिलांच्या कष्टाचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर आरतीने मुंबई पोलीस दलात निवड मिळवत यशाचा मानाचा तुरा रोवला.

आरती रविंद्र सकट – देशप्रेम आणि अथक मेहनतीच्या जोरावर पोलीस दलात जाण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले, याचा मनस्वी आनंद आहे. या यशामागे आई-वडील व भावाची साथ आणी विश्वास हेच माझे खरे बळ ठरले. हे यश अंतिम नसून, यापुढे परिक्षा देऊन पोलीस निरीक्षक पदावर विराजमान होण्याचा माझा निर्धार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!