‘माझी आई आजारी आहे…’; पुण्यातील देवळात महिलेला भावुक केलं, विश्वास ठेवताच भामट्यांनी मोठा डाव साधला

पुणे : मंदिरात दर्शनासाठी आलेल्या वयोवृद्ध महिलेचा विश्वास संपादन करून भामट्यांनी तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास केल्याची धक्कादायक घटना चाकण परिसरात घडली आहे. दानधर्माच्या नावाखाली महिलेला भावनिक साद घालत दोन भामट्यांनी तिची फसवणूक केली.
हातचलाखी करत तब्बल दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र घेऊन दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला. ही घटना चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील भोसे गावठाण येथील महादेव मंदिरात गुरुवारी (27 ऑगस्ट) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.

‘आई आजारी आहे, दान करायचंय…’
मिळालेल्या माहितीनुसार, दोन भामट्यांनी मंदिरात आलेल्या वयोवृद्ध महिलेला हेरलं. त्यानंतर त्यांनी महिलेशी संवाद साधत भावनिक कारण सांगितलं. ‘माझी आई खूप आजारी आहे. ती लवकर बरी व्हावी म्हणून आम्हाला एका गरजू व्यक्तीला पैसे दान करायचे आहेत,’ असा बनाव त्यांनी केला.


भामट्यांच्या या बोलण्यावर महिलेने विश्वास ठेवला आणि त्यांच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली. याच संधीचा फायदा घेत दोघांनी हातचलाखी केली आणि महिलेच्या गळ्यातील सुमारे दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले. त्यानंतर दोघेही तिथून पसार झाले.
फसवणूक लक्षात येताच पोलिसांत धाव
काही वेळाने आपली फसवणूक झाल्याचं महिलेच्या लक्षात आलं. त्यानंतर तिच्या सुनेने तातडीने चाकण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात फसवणूक आणि चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील CCTV फुटेज तपासण्यात येत असून, त्याआधारे दोघांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
नागरिकांनी सावध राहण्याचं आवाहन
मंदिर, धार्मिक स्थळं किंवा सार्वजनिक ठिकाणी अनोळखी व्यक्तींकडून दानधर्म, पैशांची मदत किंवा सोन्याचे दागिने सुरक्षित ठेवण्याच्या नावाखाली संपर्क साधला गेल्यास नागरिकांनी सावध राहावं. अशा व्यक्तींवर सहज विश्वास न ठेवता संशयास्पद प्रकार आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.