FDA चा औषध कंपन्यांवर मोठा दणका! 4 महिन्यांत 19 कोटींचा औषधसाठा जप्त; तुकाराम मुंढेंनी दिली धक्कादायक आकडेवारी..


मुंबई : महाराष्ट्रात औषध उत्पादन आणि विक्री क्षेत्रातील अनियमितता रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली आहे. जून ते सप्टेंबर २०२६ या चार महिन्यांत राज्यभरात तब्बल ४,२५६ तपासण्या करण्यात आल्या.

या कारवाईत सुमारे १९.११ कोटी रुपयांचा औषधसाठा जप्त करण्यात आला असून, विविध प्रकरणांत ३३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच १४ जणांना अटक करण्यात आली आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ही माहिती दिली.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या चार महिन्यांत औषध उत्पादन करणाऱ्या आस्थापनांच्या ९६५, तर औषध विक्री करणाऱ्या आस्थापनांच्या ३,२९१ तपासण्या करण्यात आल्या. निर्धारित उद्दिष्टाच्या तुलनेत १३१ टक्के तपासण्या पूर्ण करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

तपासणीदरम्यान विविध त्रुटी आणि नियमांचे उल्लंघन आढळल्याने संबंधित आस्थापनांना एकूण १,४०२ नोटिसा बजावण्यात आल्या. याशिवाय औषध उत्पादन आणि विक्रीशी संबंधित २८८ परवाने रद्द करण्यात आले, तर ८५६ परवाने निलंबित करण्यात आले. अशा प्रकारे परवान्यांबाबत एकूण १,१४४ कारवाया करण्यात आल्या.

औषधांच्या बेकायदेशीर साठवणुकीवर आणि विक्रीवरही प्रशासनाने लक्ष केंद्रित केले. छापे आणि जप्तीच्या ११५ कारवायांमधून मोठ्या प्रमाणात औषधसाठा ताब्यात घेण्यात आला. विनापरवाना औषधसाठा आणि विक्रीप्रकरणी ४३ कारवाया करण्यात आल्या. तसेच आक्षेपार्ह जाहिरातींच्या ३१ प्रकरणांमध्येही कारवाई करण्यात आली.

बनावट औषधे आणि सौंदर्यप्रसाधनांशी संबंधित १४, तर चुकीचे ब्रँडिंग असलेल्या सौंदर्यप्रसाधनांबाबत १० कारवाया करण्यात आल्या. यासोबतच NDPS कायद्यांतर्गत गुंगीकारक औषधांच्या गैरवापराविरोधात नऊ, तर वैद्यकीय उपकरणांशी संबंधित तीन कारवाया करण्यात आल्या.

फसव्या साधर्म्याची ब्रँड नावे आणि लेबलविषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही FDA ने कारवाई केली आहे. नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार औषधे उपलब्ध करून देणे, तसेच औषधांचे उत्पादन आणि विक्री करताना नियमांचे पालन सुनिश्चित करणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. भविष्यातही तपासणी आणि अंमलबजावणीची मोहीम अधिक व्यापक करण्यात येणार असल्याचे FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!