साखरेची किमान विक्री किंमत ५० रुपये तर ऊसाला प्रतिटन १ हजार रुपये अनुदान मिळावे म्हणून केंद्राकडे मागणी; हर्षवर्धन पाटील यांची माहिती..

इंदापूर : साखर उद्योगाला दिलासा मिळावा म्हणून केंद्र सरकारकडे साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) प्रति किलो ५० रुपये तसेच दुष्काळामुळे उसाचे टनेज आणि साखर उतारा कमी होण्याची शक्यता निर्माण झाल्याने उसासाठी प्रति टन १ हजार रुपये अनुदान देण्याची मागणी केल्याची माहिती राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे.
शहाजीनगर (ता.इंदापूर) येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर अग्नीप्रदिपन सोहळ्याच्या आयोजित कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील हे बोलत होते. हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले की,दुष्काळी परिस्थितीमुळे यंदाचा गळीत हंगाम कमी कालावधीचा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस तोडणीसाठी घाई करू नये. कारखाना ऊस दरामध्ये मागे राहणार नाही तसेच शेतकऱ्यांची ऊस बिले वेळेवर अदा केली जातील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

साखर उद्योगाला दिलासा मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) प्रति किलो ५० रुपये करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच दुष्काळामुळे उसाचे टनेज आणि साखर उतारा कमी होण्याची शक्यता असल्याने गाळप होणाऱ्या उसासाठी प्रति टन १ हजार रुपये अनुदान देण्याची मागणीही करण्यात आली असल्याचे पाटील यांनी सांगितले.


दरम्यान, राज्यातील साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन मंजूर केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आभार मानले.
हार्वेस्टिंग प्रोग्रॅमनुसार सर्व उसाचे गाळप करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस निरा भीमा कारखान्याला देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
