बिहार की पुणे! उरुळीकांचनमध्ये रात्रीची गस्त घालणाऱ्या पोलिसांवर तिघांचा हल्ला; वर्दीची बटणे तोडली, गाडीची काच फोडली… वर्दीवरच हल्ला होत असेल, तर सामान्यांची काय अवस्था?

उरुळी कांचन : अंधारात संशयास्पदरित्या थांबलेल्या तीन तरुणांकडे विचारपूस करण्यासाठी गेलेल्या रात्रगस्तीवरील पोलीस हवालदाराला धक्काबुक्की करून, त्यांच्या अंगावरील वर्दीचे बटण तोडल्याची घटना समोर आली आहे. तसेच सरकारी स्कार्पिओ गाडीची डाव्या बाजूच्या आरशाची काच फोडल्याची घटना घडली. याबाबत उरुळी कांचन येथील तिघांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कडक कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुभम रवींद्र लोणारी (वय -28, रा. महात्मा गांधी शाळेसमोर, उरुळी कांचन, ता. हवेली), ओंकार राजू वाकचोरे (रा. उरुळी कांचन, ता. हवेली), धीरज लक्ष्मण नागटिळे (रा. दातार कॉलनी, उरुळी कांचन, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार संतोष गणपत जाधव (वय 45, व्यवसाय नोकरी, यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संतोष जाधव हे मंगळवारी (ता. 13) पहाटे पहाटे चार वाजण्याच्या सुमारास चालक पोलीस हवालदार दाणे आणि होमगार्ड नवनाथ चव्हाण यांच्यासह सरकारी स्कार्पिओ गाडीतून (MH 12 ZC 1392) रात्रगस्त घालत होते.


उरुळी कांचन गावातील महात्मा गांधी शाळेच्या गेटसमोर, तुपे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला अंधारात तीन तरुण संशयास्पदरित्या उभे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी गाडी जवळ नेऊन त्यांची विचारपूस केली असता, धीरज नागटिळे याच्या हातात रबरी भरीव दांड्यासारखे धोकादायक हत्यार दिसून आले. हत्याराबद्दल विचारणा करताच या तिघांनी पोलिसांशी जोरजोरात आरडाओरडा करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी शांत करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी आरेरावीची भाषा वापरत पोलीस हवालदार जाधव यांना थेट हाताने धक्काबुक्की केली. या झटापटीत हवालदार जाधव यांच्या शर्टचे वरचे बटण तुटले. एवढ्यावरच न थांबता या तरुणांनी सरकारी स्कार्पिओ गाडीच्या डाव्या बाजूच्या आरशाची तोडफोड करून नुकसान केले आणि अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.
दरम्यान, पोलीस हवालदार संतोष जाधव यांच्या फिर्यादीवरून उरुळी कांचन पोलीस ठाण्यात वरील तिन्ही आरोपींविरोधात शासकीय कामात अडथळा आणणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे आणि धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार सस्ते करत आहेत.
