जादूटोण्याचा संशय; ७५ वर्षीय वृद्धला पेटलेल्या निखाऱ्यांवरून चालवलं; वृद्ध गंभीर जखमी, गुन्हा दाखल
मुरबाड : जादूटोण्याच्या संशयावरून एका ७५ वर्षांच्या व्यक्तीला आगीतून चालायला लावल्याचा धक्कादायक प्रकार मुरबाड तालुक्यातील केरवेळे गावातुन समोर आला आहे. याप्रकरणी गावातील नऊ व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मण भावार्थे असे या वृद्ध व्यक्तीचे नाव असून ते या प्रकारात जखमी झाले आहेत. याप्रकरणी त्यांच्या मुलीने मुरबाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गावातील नऊ व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुरबाडच्या केरवेळे गावात जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्ताने जागरण सुरू असताना त्यातील काही व्यक्ती थेट लक्ष्मण भावार्थे यांच्या घरात शिरले. त्यांनी लक्ष्मण भावार्थे यांना ओढून कार्यक्रमाच्या ठिकाणी आणले होते.
जादूटोणा आणि करणी करण्याच्या संशयावरून त्यांना जबरदस्तीने आगीवर नाचायला लावले. याबाबतची एक चित्रफीत प्रसारित होत असून त्यात काही तरुण भावार्थे यांना ओढून निखाऱ्यावर चालवत आहेत. पुढे त्यांना त्या निखाऱ्यावर पाडण्यातही आल्याचे दिसले आहे.
दरम्यान, यावेळी भावार्थे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या पायाला फोड आले असून पाठीवरही भाजले आहे. याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.