ट्युशनमध्ये १० वर्षाच्या मुलाला बेल्ट अन् वह्यांनी बेदम मारहाण, कोंढवा परिसरातील घटना, शिक्षिका ताब्यात..

पुणे : खासगी ट्युशनमध्ये १० वर्षांच्या मुलाला बेल्ट अन् वह्यांनी मारहाण केल्या प्रकरणी शिक्षिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील कोंढव्यातून हा प्रकार समोर आला आहे. बुधवारी सायंकाळी कोंढव्यात राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेने घरात ट्युशनवेळी १० वर्षाच्या मुलाला मारहाण केली आहे.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणी पोलिसांनी संबंधित शिक्षिकेवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना पुण्यातील कोंढवा परिसरात घडली. शिक्षिका आणि मुलगा एकाच परिसरात राहायला आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलाने गृहपाठ केला नव्हता. आणि याच रागात शिक्षिकेने त्या मुलाला बेल्ट आणि वह्यांनी मारले. यात मुलाला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्या पालकांनी तात्काळ पोलिसांत धाव घेत शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, पोलिसांनी शिक्षिकेवर बालकांवरील अत्याचारासंबंधी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे पालकांमधून संताप व्यक्त केला जात असून, मुलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे ट्युशन क्लासेसच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
रूग्णालयात मुलावर प्राथमिक उपचार केल्यानंतर घरी सोडण्यात आले. आईने सदर वैद्यकीय कागदपत्राच्या आधारावर शिक्षिकेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे, असे पाटणकर यांनी संगितले. पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या संबंधित कलमांखाली जाणीवपूर्वक दुखापत करण्याशी संबंधित गुन्हा दाखल केला आहे. कोंडवा पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे.