धक्कादायक! पीएमपीतील महिला वाहकाचा विनयभंग; पीएमपी चालकाला बंडगार्डन पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे : पीएमपीतील महिला वाहकाचा चालकाने विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीएमपी चालकाला बंडगार्डन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

सुनिल कोंडीबा भालेकर (वय ४३, रा. सरकारवाडा, कान्हूर पठार, ता. पारनेर, जि. अहमदनगर) असे अटक केलेल्या चालकाचे नाव आहे. याप्रकरणी महिला वाहकाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला पीएमपीच्या पुणे स्टेशन आगारात वाहक म्हणून काम करतात. तर आरोपी भालेकर तिच्या ओळखीचा आहे. मागील दोन ते तीन महिन्यांपासून आरोपी सुनील भालेकर हा फिर्यादी यांच्यासोबत असभ्य वर्तन करत होता.

तू मला खूप आवडते. माझ्या प्रेमाचा स्विकार कर, असे सांगून त्याने फिर्यादी यांचा विनयभंग केला. फिर्यादी यांनी त्याला झिडकारल्याने भालेकर याने तिला शिवीगाळ करुन धमकावले. सहायक पोलीस निरीक्षक मधाळे तपास करत आहेत.