इंदापूर विहीर दुर्घटनाप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई! विहीर मालक व कंत्राटदारावर सदोष मनुष्यवचा गुन्हा दाखल; विहीर मालकाला बेड्या..

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथे विहिरीचं काम सुरू असताना अचानक मातीचा ढिगारा कोसळला. या दुर्घटनेत चार कामगारांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. तब्बल ६६ तासांच्या अथक प्रयत्नानंतर चारही मजूरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

याप्रकरणी विजय क्षीरसागर आणि ठेकेदार विश्वास गायकवाड या दोन जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी विहीर मालक विजय क्षीरसागर याला अटक केल्याची माहिती आहे.
सोमनाथ लक्ष्मण गायकवाड (वय ३२ वर्षे), जावेद अकबर मुलाणी (वय३० वर्षे), परशुराम बन्सीलाल चव्हाण (वय ३० वर्षे), मनोज मारूती चव्हाण (वय ४० वर्षे) अशी मृत कामगारांची नावे आहेत.

इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथे एका दगडी खाणीला विहिरीत रुपांतरित करण्याचे काम सुरू होते. यावेळी विहिरीत चार मजूर काम करत होते. दरम्यान, विहिरीचा कठडा बांधताना रिंग व माती ढासळल्याने चारही मजूर मातीखाली गाडले गेले. ही दुर्घटना १ ऑगस्ट रोजी घडली होती.

पण, त्याचा उलगडा रात्री उशिरा झाला, त्यानंतर शोध आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं होतं. तब्बल ६६ तासांच्या अथक प्रयत्नानंतर एनडीआरएफने चौघांचे मृतदेह बाहेर काढले.
दरम्यान, दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या नातेवाईकांनी विहिरीचे कामे बेकायदेशीर असून या मालकाने ४ कुटुंबांचा जीव धोक्यात घातला, अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी विहीर मालक आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.