बारामतीतील व्यावसायिकाला पुण्यात मागितली १० लाखांची खंडणी! खंडणी मागण्याच्या पद्धतीमुळे पोलीसही अवाक…

पुणे : बारामती येथील व्यावसायिक पुण्यात जेवायला आले असताना त्यांच्या कारला चिठ्ठी लावून १० लाख रुपयांची खंडणी मागण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

तुला तुझा व तुझ्या कुटुंबियांचा जीव वाचवायचा असल्यास आम्हाला कोरेगाव पार्क येथे १० लाख रुपये आणून दे, अशी धमकी देण्यात आली. यामुळे एकच खळबळ उडाली.
याप्रकरणी बारामती येथील एका ३७ वर्षाच्या व्यावसायिकाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ३१ जुलै रोजी रात्री साडेआठ ते १ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय आहे. ते आपल्या मित्रांसह कोरेगाव पार्क येथील डेझर्ट वॉटर येथे जेवणाकरीता आले होते. त्यांनी आपली कार पार्किंगमध्ये पार्क करुन जेवायला गेले. जेवण करुन परत आल्यावर त्यांना दरवाजावर बंद पाकिट चिटकविलेले होते.
त्यात फिर्यादी व त्यांचे कुटुंबियास जीवे ठार मारण्याची धमकी देऊन १० लाख रुपयांची मागणी केली होती. त्यात दिलेल्या नंबरवर त्यांनी मित्राचा मोबाईलवरुन फोन केल्यावर तो कोणी उचलला नाही. त्यानंतर दुसर्या दिवशी ते जेजुरी येथे असताना मित्राचे मोबाईलवर फोन आला.
तुला, तुझ्या कुटुंबियांचा जीव वाचवायचा असल्यास आम्हाला कोरेगाव पार्क या ठिकाणी १० लाख रुपये आणून दे, अशी धमकी दिली. कोरेगाव पार्क पोलीस अधिक तपास करीत आहेत.