कुंजीरवाडी – थेऊर फाटा परिसरात चोरट्यांचा राडा! धारदार शस्त्रे घेऊन फिरणारे चोरटे सीसीटीव्हीत कैद…

उरुळी कांचन : पुणे सोलापूर महामार्गावर कायम गजबजलेल्या थेऊर फाटा तसेच कुंजीरवाडी परिसरात चोरीच्या उद्देशाने घातक शस्त्रे घेऊन फिरणारे चोरटे शुक्रवारी (ता २८) पहाटे पाऊणे तीन वाजण्याच्या सुमारास सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

तसेच कुंजीरवाडी व थेऊर फाटा परिसरात तीन ठिकाणी घरफोडी झाल्याच्या घटना उघडकीस आल्या असून याला लोणी काळभोर पोलिसांनीही दुजोरा दिला आहे. मात्र चोरी झालेल्या घटनेतील नागरिकांनी याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अद्याप तक्रार दिली नाही.
सीसीटीव्ही व्हायरल..

थेऊर फाटा परिसरात एका दुकानाच्या समोर काही दरोडेखोर गावठी बंदूक घेऊन दिसून येत आहेत. तर काहीच्या पाठीवर कटावणी दिसून येत आहे. सदरच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये ६ ७ तरुण दिसून येत असून २० ते २५ वयोगटातील असल्याचे दिसून येत आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ मागील काही दिवसांपासून सुरू आहे. दुचाकी गाड्यां चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. सदनिकांचे कडी कोयंडे तोडून ऐवज चोरून नेण्याचे प्रकार उघडकीस येत आहे.
त्यामुळे नागरिक अस्वस्थ झाले असून, गेल्या काही दिवसांपासून लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध ठिकाणांना चोरट्यांनी टार्गेट केल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून मध्यरात्री एक ते चारपर्यंत अशा चोऱ्यांचे प्रकार घडत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, थेऊर फाटा परिसरात घरातील सर्वजण एका व्यक्तीच्या मयतीला गेले असता चोरट्यांनी घरात प्रवेश करून रोख रक्कम, सोन्याचे व चांदीचे दागिने असा सुमारे दोन ते सव्वा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची माहिती मिळत आहे.
तसेच आणखी दोन ठिकाणी चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला असून किरकोळ चोरी करून चोर पळून गेले आहेत. याबाबत अद्यापपर्यत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार देण्यात आलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून मध्यरात्री एक ते चारपर्यंत अशा चोऱ्यांचे प्रकार घडत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.