सह्याद्री अँग्रोस व्यवस्थापकीय संचालकांने साडेनऊ कोटींचा घातला गंडा; बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा..

बारामती : येथील सह्याद्री अँग्रो व डेअरी प्रा. लि. कंपनीच्या तब्बल ९ कोटी ९६ लाख रुपयांच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कंपनीच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २०१६ ते २०२१ या कालावधीत घडली आहे.

आशिष दुबे (रा. बाणेर, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संचालकाचे नाव आहे. याप्रकरणी संतोष पोपटराव सावंत यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, सह्याद्री अग्रो व डेअरी प्रा. लि. मध्ये सन. २०१६ ते २०२१ या कालावधीत या कंपनीच्या संचालक मंडळाने दुबे यांची मुख्य व्यवस्थापकीय संचालक पदावर नेमणूक केली होती.

त्यांनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी पदाचा गैरवापर करून कंपनी तोट्यामध्ये असल्याचे माहिती असताना देखील लाभांश मिळविण्यासाठी ती नफ्यामध्ये दाखवून कंपनीचे कर स्वरुपात १ कोटी ४० लाख २० हजार रुपयांचे नुकसान केले.

स्वताःला ५२,५४,२०० रूपयांचा लाभांश प्राप्त करून, देय नसलेला ३७ लाख ४९ हजारांचा बोनस प्राप्त करून, रजेच्या दिवशी कामावर न येता आल्याचे दाखवून २२ लाख ५४ हजार रुपये प्राप्त करून, इतर वाहनांपेक्षा चढया दराने नातेवाईकांची वाहने कंपनीमध्ये लावून ४ लाख ६८ हजार रूपयांच्या नुकसानीस, नोकरीवरून काढले असतांना देखील कंपनीचे भाडेतत्वावरील वाहन जमा न करता २ लाख ७१ हजारांच्या कंपनीचे नुकसान केले.
नियुक्तीपत्रामध्ये एकच ड्रायव्हर मंजूर असतांना दोन ड्रायव्हरचा वापर करून १३ लाख ८९ हजारांच्या रूपयांच्या नुकसानीस, चढया दराने बिले दिल्याने गंगाजळीत टाकावी लागलेल्या पावणे तीन कोटी रूपयांच्या नुकसानीस व एका कंपनीसोबत सोबत जोपासलेल्या आर्थिक हितसंबंधामुळे कंपनीस बॅंक व्याजापोटी भराव्या लागलेल्या ४ कोटी ७३ लाखांचा नुकसान झाल्याने एकुण ९९ कोटी रुपयांच्या ६२ लाखांच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याने बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.