उरुळीकांचनमध्ये इमारतीवरून कोसळून मजूराचा दुर्दैवी मृत्यू ; गरीब कुटूंबावर काळाचा घाला

उरुळी कांचन : इमारतीचे काम सुरु असताना तोल जाऊन एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उरुळी कांचन (ता. हवेली ) ग्रामपंचायत हद्दीतील दत्तवाडी परिसरात रविवारी (ता. ०९) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

चंद्रकांत रामचंद्र कांबळे (वय- ५५ रा. तुपे वस्ती, उरुळी कांचन, ता. हवेली) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील दत्तवाडी परिसरात अशोक लक्ष्मण वेताळ यांच्या सदनिकेचे काम सुरु आहे. या ठिकाणी चंद्रकांत कांबळे हे सेंट्रिंगचे काम तिसऱ्या मजल्यावर करीत होते. यावेळी त्यांनी कोणत्याही प्रकारची सुरक्षितता बाळगली नव्हती. काम सुरु असताना अचानक कांबळे यांचा पाय निसटला व ते जमिनीवर आपटले.

दरम्यान, त्यांना तात्काळ उरुळी कांचन येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
