सर्वात मोठा सर्व्हे!! कुणाच्या किती जागा? मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना ‘एवढ्या’ टक्के जनतेची पसंती…
मुंबई : भाजप, शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना विधानसभा निवडणुकीत रंगणार हे स्पष्ट आहेच. मात्र, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हे सांगणारा एक सर्व्हे समोर आला आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आता झाल्या तर भारतीय जनता पक्षाला सव्वाशे जागा मिळतील, असा अंदाज ‘न्यूज एरिना इंडिया’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती देवेंद्र फडणवीस यांना मिळाली असून राज्यातील तब्बल ३५ टक्के लोकांनी फडणवीस यांना कौल दिला आहे.
विशेष म्हणजे ‘न्यूज एरिना इंडिया’ संस्थेने कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्व्हे केला होता. त्या सर्व्हेत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. कर्नाटकमध्ये काँग्रेसने भाजपचा पराभव करत सत्ता स्थापन केली. त्यामुळे या सर्व्हेचे महत्व वाढले आहे.
राज्यात विधानसभेची निवडणूक झाल्यास भाजपला १२३ ते १२९ जागा मिळतील. तर, शिंदे गटाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला अवघ्या २५ जागा मिळतील. त्याखालोखाल राष्ट्रवादीला ५५ ते ५६, काँग्रेसला ५० ते ५३ आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला फक्त १७ ते १९ जागा मिळतील असा अंदाज या सर्वेमधून व्यक्त करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसच
राज्यातील ३५ टक्के जनतेने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना पसंती दिली आहे. तर अजित पवार आणि अशोक चव्हाण यांना २१ टक्के जनतेने पसंती दिली आहे.
तर, १२ टक्के जनतेला विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे असे वाटत आहे. तर, देशातील पाच लोकप्रिय मुख्यमंत्री यांच्या रांगेत जाऊन बसलेले उद्धव ठाकरे यांच्या नावावर फक्त ९ टक्के जनतेने शिक्कामोर्तब केले आहे.
विभागनिहाय भाजपचे आमदार किती?
भाजपचे सर्वधिक आमदार विदर्भातून निवडून येतील असे हा सर्वे सांगत आहे. विदर्भात ३० ते ३१, खान्देशमध्ये २३, मराठवाड्यात १९, पश्चिम महाराष्ट्र्र २२ ते २३ आणि कोकणसह मुंबईत २९ जागा निवडून येतील असे ‘न्यूज एरिना इंडिया’च्या सर्व्हेत म्हटले आहे.
महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढविली, तर काँग्रेसला सर्वाधिक फायदा होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी चांगली होणार असली तरी ठाकरे गटाला १७ ते १९ जागा मिळण्याचा अंदाज न्यूज एरिना इंडिया’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे.