आधी प्रेमविवाह, मग धर्मांतराचा दबाव; पत्नीचा नकार अन् पतीने थेट कोयताच उचलला! पुण्यातील घटनेने खळबळ

दौंड : प्रेमसंबंधातून विवाह, संसाराची सुरुवात आणि त्यानंतर धर्मांतरावरून सुरू झालेला छळ… अखेर हा वाद रक्तरंजित हल्ल्यापर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात घडली आहे. मुस्लिम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीच्या डोक्यावर कोयत्याने वार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ‘धर्म बदलला नाही तर जीवे मारेन’, अशी धमकीही दिल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले. बोरीपार्धी येथील या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून यवत पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मौलाअल्ली बाबुलाल शेख असे आरोपी पतीचे नाव आहे. या प्रकरणी २५ वर्षीय विवाहितेने पोलिसांत फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २०२४ मध्ये बोरीपार्धी येथील एका रुग्णालयात काम करत असताना संबंधित महिलेची मौलाअल्ली याच्याशी ओळख झाली. हळूहळू दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर विवाह करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कुटुंबीयांचा विरोध असल्याने दोघांनी ठाणे येथे हिंदू रीतिरिवाजानुसार लग्न केले. विवाहानंतर ते बोरीपार्धी येथे भाड्याच्या खोलीत राहू लागले. त्यांना दोन वर्षांचा मुलगाही आहे.

संसारात धर्मांतराचा मुद्दा, नकार दिल्यावर छळाचा आरोप

लग्नानंतर सुरुवातीला पतीचे वर्तन चांगले होते. मात्र, काही काळानंतर हिंदू धर्माचे पालन करण्यावरून त्याने वाद घालण्यास सुरुवात केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी तिच्यावर वारंवार दबाव टाकला जात होता. धर्मांतरास विरोध केल्यावर मारहाण आणि मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोपही तिने केला आहे.

२२ नोव्हेंबरची सकाळ ठरली धक्कादायक
रविवारी, २२ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी पुन्हा धर्मांतराचा विषय निघाला. पतीने मुस्लिम धर्म स्वीकारण्याचा आग्रह धरला; मात्र पत्नीने नकार दिला. यानंतर संतापलेल्या पतीने घरातील कोयता उचलून तिच्या डोक्यावर वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात तिच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्राव झाला. धर्म स्वीकारला नाही तर जीवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
भीतीमुळे हल्ल्याचे खरे कारण लपवले
हल्ल्यानंतर महिलेने खासगी रुग्णालयात उपचार घेतले. सुरुवातीला भीतीपोटी तिने दुचाकीवरून पडल्यामुळे दुखापत झाल्याचे सांगितले. पतीकडून होणारी मारहाण आणि धमक्यांमुळे यापूर्वी पोलिसांत तक्रार करण्याचे धाडस झाले नसल्याचे तिने स्पष्ट केले. अखेर तिने यवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार मौलाअल्ली बाबुलाल शेख याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गाडेकर करीत आहेत.
