पावसाचा चुकीचा अंदाज शेतकऱ्यांना महागात पडला? पंजाब डख यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल..


मुंबई : हवामानाचा अंदाज वर्तवणारे अभ्यासक पंजाब डख यांच्या विरोधात माजी आमदार भीमराव धोंडे यांनी आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. पंजाब डख यांनी दिलेल्या पावसाच्या अंदाजांमुळे शेतकऱ्यांची दिशाभूल झाली असून, त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागल्याचा आरोप धोंडे यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

पंजाब डख हे सोशल मीडिया आणि विविध व्हिडिओंच्या माध्यमातून राज्यातील हवामान आणि पावसाचे अंदाज व्यक्त करत असतात. त्यांच्या अंदाजांवर विश्वास ठेवून अनेक शेतकरी पेरणी, फवारणी, पीक काढणी यांसारखे शेतीविषयक निर्णय घेत असल्याचे तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे. मात्र, डख यांनी वर्तवलेले काही अंदाज प्रत्यक्ष हवामानाशी जुळले नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा भीमराव धोंडे यांनी केला आहे.

10 मुद्द्यांच्या आधारे चौकशी करण्याची मागणी

या तक्रार अर्जात धोंडे यांनी 10 प्रमुख मुद्दे उपस्थित केले आहेत. पंजाब डख यांनी यापूर्वी दिलेल्या हवामान अंदाजांची भारतीय हवामान विभागाच्या अधिकृत माहितीशी तुलना करून त्यांची अचूकता तपासावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच पावसाबाबत अंदाज व्यक्त करताना निश्चित स्वरूपाची विधाने करण्यात आली होती का आणि आवश्यक ती सावधगिरी बाळगण्यात आली होती का, याचीही चौकशी करण्यास सांगितले आहे.

याशिवाय यूट्यूब, फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित करण्यात आलेले व्हिडिओ व संदेश तपासण्याची मागणी करण्यात आली आहे. हवामानाचे अंदाज वर्तवण्यासाठी कोणत्या वैज्ञानिक माहितीचा आधार घेतला जातो, तसेच या अंदाजांमुळे शेतकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयांचा आणि त्यांच्या आर्थिक नुकसानीचा तपशीलही गोळा करावा, असे धोंडे यांनी म्हटले आहे.

आष्टी, पाटोदा, शिरूरसह बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जबाब नोंदवावेत, तसेच त्यांच्याकडील व्हिडिओ, स्क्रीनशॉट, संदेश आणि शेती खर्चाच्या पावत्यांसारखे पुरावे जमा करावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. यासोबतच हवामानाचे अंदाज प्रसारित करण्यामागे कोणताही आर्थिक लाभ किंवा व्यावसायिक हेतू होता का, याची कायदेशीर पडताळणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, या तक्रारीनंतर आष्टी पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेते आणि चौकशीतून काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, तक्रार अर्जातील आरोपांची अद्याप स्वतंत्र पडताळणी झालेली नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!