पुण्यात अजब प्रकार! पोलीस चौकीसमोरच दुचाकी चोरीला, कामावरून परतताच स्टेशन मास्तरच्या पायाखालची जमीन सरकली

पुणे : पुण्यात चोरट्यांनी आता थेट पोलीस चौकीसमोरच हात साफ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील लोहमार्ग पोलीस चौकीसमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. विशेष म्हणजे, पोलीस चौकीच्या अगदी समोरूनच दुचाकी चोरीला गेल्याने परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.
स्टेशन मास्तरची दुचाकी चोरीला

प्रमोद सोर (वय ४४, रा. कात्रज, पुणे) असे दुचाकी चोरीला गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते मध्य रेल्वेमध्ये स्टेशन मास्तर म्हणून कार्यरत आहेत. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.२५ वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपली दुचाकी पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील लोहमार्ग पोलीस चौकीसमोर पार्क केली होती. त्यानंतर ते आपल्या कामासाठी निघून गेले.

कामावरून परतले अन् दुचाकी गायब!

सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास काम संपवून प्रमोद सोर परत आले. मात्र, त्यांनी ज्या ठिकाणी दुचाकी पार्क केली होती, त्या ठिकाणी गाडी दिसून आली नाही. परिसरात शोध घेतल्यानंतरही दुचाकी न मिळाल्याने ती चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
पोलीस चौकीसमोरूनच चोरी; पोलिसांसमोर आव्हान
या घटनेनंतर प्रमोद सोर यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रेल्वे स्टेशनसारख्या वर्दळीच्या ठिकाणी आणि थेट लोहमार्ग पोलीस चौकीसमोरूनच दुचाकी चोरीला गेल्याने प्रवाशांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. आता या चोरट्याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
