पवारांच्या एका निर्णयाने काँग्रेसमध्ये खळबळ! वडेट्टीवारांचा थेट आरोप; सुप्रिया सुळेंना विचारला मुख्यमंत्रिपदाचा सवाल

नवी दिल्ली : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राजकीय भूमिकेवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मतदारसंघ पुनर्रचनेच्या विधेयकाला पाठिंबा दिल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पवार कुटुंबावर जोरदार निशाणा साधला. पवार एनडीएसोबत जातील, अशी अपेक्षा नव्हती; मात्र त्यांच्या राजकीय इतिहासाचा दाखला देत वडेट्टीवार यांनी गंभीर टीका केली. एवढेच नाही, तर भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री होण्याचा प्रयत्न सुरू आहे का, असा सवालही त्यांनी सुप्रिया सुळे यांना केला.
दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. शरद पवार यांनी संपूर्ण राजकीय कारकीर्द पुरोगामी विचारांशी जोडून ठेवली. अशा नेत्याने जातीयवादी आणि धर्मांध शक्तींसोबत जाण्याची भूमिका घेणे अनपेक्षित असल्याचे ते म्हणाले. पवारांच्या राजकारणात वेळोवेळी भूमिका बदलण्याचा इतिहास असल्याचा आरोप करत त्यांनी ‘खंजीर खुपसण्याची परंपरा’ असा कठोर शब्दप्रयोग केला. राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेशिवाय राहणे मान्य नसल्याची टीकाही त्यांनी केली.

पवारांना राज्यसभेसाठी पाठिंबा दिला, आता त्याच विचारांना धक्का?

वडेट्टीवार म्हणाले की, शरद पवार यांना वयाच्या ८५व्या वर्षी राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेससह इतरांनी पाठिंबा दिला होता. फुले, शाहू आणि आंबेडकर यांचा पुरोगामी विचार त्यांच्या माध्यमातून पुढे जावा, ही त्यामागची भूमिका होती. मात्र, मतदारसंघ पुनर्रचनेच्या विधेयकाला राष्ट्रवादीने दिलेल्या पाठिंब्यामुळे त्या विचारांनाच धक्का बसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

या विधेयकामुळे भविष्यात देशातील लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. संविधान आणि लोकशाही कमकुवत करण्याच्या दिशेने हे पाऊल असल्याचे काँग्रेसचे मत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दहा आमदारांच्या जोरावर मुख्यमंत्रीपद मिळणार?
वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादीच्या संभाव्य सत्तासमीकरणांवरही प्रश्न उपस्थित केला. अवघ्या दहा आमदारांच्या बळावर मुख्यमंत्रिपदाची अपेक्षा ठेवणे हास्यास्पद असल्याचे ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे ६० आमदार असतानाही भाजपने त्यांना मुख्यमंत्रिपद देण्यास नकार दिला होता, याची आठवण त्यांनी करून दिली. मग मतदारसंघ पुनर्रचनेच्या विधेयकाला पाठिंबा दिल्यामुळे राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद मिळणार असेल, तर ते भाजपच्या मदतीनेच मिळेल, असा टोला त्यांनी लगावला.
सुप्रिया सुळेंच्या भूमिकेवरही संशय
सुप्रिया सुळे यांच्या यापूर्वीच्या विधानांचाही वडेट्टीवार यांनी उल्लेख केला. भाजप नेत्यांच्या भेटीगाठी किंवा पंतप्रधानांसोबतच्या चर्चांवर काँग्रेसने आक्षेप घेतलेला नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र, या घडामोडींमधून सुप्रिया सुळे यांना सत्तेत सहभागी होण्याची इच्छा असल्याचे संकेत मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला.
राष्ट्रवादीत फूट पडू नये म्हणून विधेयकाला पाठिंबा दिल्याची चर्चा कितपत खरी आहे, याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. तमिळनाडूमधील राजकीय घडामोडींचा संदर्भ देत, विरोधकांच्या बैठकीला अनुपस्थित राहण्यामागे सत्ताधारी पक्षासोबत जाण्याचा निर्णय आधीपासूनच ठरला होता का, असा सवाल त्यांनी केला.
शेवटी शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे दोघेही महत्त्वाचे निर्णय एकत्र घेतात, असे सांगत वडेट्टीवार यांनी हा निर्णयही दोघांच्या संमतीनेच झाला असावा, असा दावा केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे पवार कुटुंब आणि काँग्रेसमधील राजकीय संघर्षाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.
