मिठाईच्या नावाखाली सुरू होता जीवाशी खेळ! तुकाराम मुंढेंची पुण्यात मोठी कारवाई; २.८८ लाखांची मिठाई नष्ट, प्रसिद्ध दुकानांवर धाड..


पुणे : अन्नपदार्थांमधील भेसळ आणि अस्वच्छतेविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा धडाका सुरू केला आहे. तुकाराम मुंढे यांनी FDA आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर राज्यभरात विविध ठिकाणी तपासणी आणि कारवाया केल्या जात आहेत.

आता FDA ने पुण्यातील मिठाई विक्रेत्यांवर मोठी कारवाई केली आहे. बुधवार पेठ परिसरातील मिठाई दुकाने आणि उत्पादन केंद्रांवर छापे टाकत तब्बल ५१२.१ किलो मिठाई जप्त करून नष्ट करण्यात आली आहे. या कारवाईमुळे मिठाई व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

आठ मिठाई विक्रेत्यांची तपासणी

बुधवार पेठ परिसरातील मिठाई विक्रेत्यांकडे अस्वच्छता आणि विनापरवाना व्यवसाय सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर FDA कडून तपासणी मोहीम राबवण्यात आली. आठ मिठाई व्यावसायिकांच्या दुकानांची तपासणी करण्यात आली. यामध्ये काही व्यावसायिकांकडे आवश्यक परवाने नसतानाही मिठाईची विक्री सुरू असल्याचे आढळून आले. FDA च्या आठ पथकांनी ही मोहीम राबवली.

या कारवाईत एकूण ५१२.१ किलो मिठाई जप्त करण्यात आली. तिची किंमत २ लाख ८८ हजार २०० रुपये होती. जप्त केलेली मिठाई नाशवंत असल्याने ती जागेवरच नष्ट करण्यात आली.

प्रसिद्ध मिठाई दुकानांचाही समावेश

FDA ने बुधवार पेठेतील मे. मंगलमूर्ती पेढे, मे. श्रीमंत पेढेवाले, मे. श्री मंगल मूर्ती, मे. धारवाडी पेढे स्वीट्स अँड स्नॅक्स, मे. जय गणेश स्वीट सेंटर, मे. अथर्व स्वीट सेंटर, मे. हर्षवर्धन मिठाई उत्पादन केंद्र आणि मे. श्री कृपा दुग्धालय या आठ व्यावसायिकांची तपासणी केली.

यापैकी श्री मंगल मूर्ती आणि हर्षवर्धन मिठाई उत्पादन केंद्र यांच्याकडे मिठाई विक्रीसाठी आवश्यक परवाना किंवा नोंदणी प्रमाणपत्र नसल्याचे आढळले. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करून व्यवसाय सुरू असल्याचे स्पष्ट झाले.

२८० किलोपेक्षा जास्त मिठाई दोन दुकानांतून जप्त

या कारवाईत श्रीमंत पेढेवाले यांच्याकडून २१५ किलो, तर श्री मंगल मूर्ती येथून १९५ किलो मिठाई नष्ट करण्यात आली. याशिवाय खव्याचे मोदक, मोतीचूर लाडू, बेसनाचे लाडू आणि विविध दुग्धजन्य पदार्थांचाही जप्त मिठाईमध्ये समावेश होता.

तपासणीदरम्यान विविध खाद्यपदार्थांचे एकूण १७ नमुने घेण्यात आले आहेत. तसेच श्री मंगल मूर्ती मिठाई सेंटरला व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

३० नोव्हेंबरला पुढील कारवाई

हर्षवर्धन मिठाई उत्पादन केंद्र नोंदणी प्रमाणपत्राशिवाय सुरू असल्याचे तपासणीत समोर आले आहे. या प्रकरणात ३० नोव्हेंबर रोजी तडजोड अर्ज दाखल केला जाणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, पुण्यातील मिठाई विक्रेत्यांवर FDA ने केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेचा आणि स्वच्छतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!