ATM मधून पैसे काढण्याच्या नियमांत मोठा बदल! RBI चे नवे निर्देश जारी, ग्राहकांनी एकदा पाहाच…


मुंबई : एटीएममधून पैसे काढणाऱ्या बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) एटीएम आणि पीओएस मशीनमधून रोख रक्कम काढण्यासंदर्भात नवीन मास्टर निर्देश जारी केले आहेत.

२७ नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या या निर्देशांनुसार, आता बँकांना ग्राहकांना त्यांच्या मासिक मोफत एटीएम व्यवहारांच्या मर्यादेबाबत माहिती देणे बंधनकारक असणार आहे. तसेच मोफत व्यवहारांची मर्यादा संपल्यानंतर किती शुल्क आकारले जाणार आहे, याची माहितीही ग्राहकांना द्यावी लागणार आहे. हे नवीन नियम तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहेत.

मोफत व्यवहारांची मर्यादा संपल्यावर मिळणार अलर्ट

नवीन नियमांनुसार, बँकांना अशी यंत्रणा तयार करावी लागणार आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या मासिक मोफत व्यवहारांची माहिती मिळू शकेल. यासाठी बँका एसएमएस किंवा इतर माध्यमांचा वापर करू शकतात. त्यामुळे ग्राहकांना किती मोफत व्यवहार शिल्लक आहेत आणि मर्यादा संपल्यानंतर पैसे काढण्यासाठी किती शुल्क आकारले जाईल, याची आगाऊ माहिती मिळणार आहे.

याशिवाय एटीएम मशीन मेट्रो शहरात आहे की नॉन-मेट्रो शहरात, याची माहितीही स्पष्टपणे दर्शवावी लागणार आहे. यासाठी एटीएमच्या स्क्रीनवर संदेश, स्टिकर किंवा पोस्टर लावण्याची व्यवस्था करता येणार आहे.

महिन्याला किती मोफत व्यवहार करता येणार?

दरम्यान, आरबीआयने सध्याच्या मोफत एटीएम व्यवहारांच्या मर्यादेत कोणताही बदल केलेला नाही. ग्राहकांना स्वतःच्या बँकेच्या एटीएममधून दरमहा पाच मोफत व्यवहार करता येतात. यामध्ये पैसे काढणे तसेच बॅलन्स तपासण्यासारख्या गैर-आर्थिक व्यवहारांचाही समावेश आहे.

दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढताना मेट्रो शहरांमध्ये तीन, तर नॉन-मेट्रो शहरांमध्ये पाच मोफत व्यवहारांची मर्यादा आहे. मोफत व्यवहारांची मर्यादा संपल्यानंतर बँका प्रत्येक अतिरिक्त व्यवहारासाठी कमाल २३ रुपये आणि लागू कर आकारू शकतात. मात्र, बँकांना त्यांच्या ग्राहकांना यापेक्षा जास्त मोफत व्यवहारांची सुविधाही देता येणार आहे.

आता UPI आणि डेबिट कार्डद्वारेही पीओएस मशीनमधून काढता येणार पैसे

नवीन निर्देशांमध्ये पीओएस मशीनद्वारे रोख रक्कम काढण्याच्या सुविधेबाबतही नियम स्पष्ट करण्यात आले आहेत. या सुविधेचा लाभ डेबिट कार्ड, पूर्ण केवायसी असलेले प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (PPI) आणि यूपीआयच्या माध्यमातून घेता येणार आहे.

या सुविधेअंतर्गत एका वेळी जास्तीत जास्त २ हजार रुपये, तर महिन्याला एकूण १० हजार रुपये काढता येतील. बँक किंवा संबंधित संस्थेकडून शुल्क आकारले गेल्यास ते व्यवहाराच्या रकमेच्या एक टक्क्यापेक्षा जास्त असू शकणार नाही.

विशेष म्हणजे, पीओएस मशीनमधून पैसे काढण्यासाठी ग्राहकांना कोणतीही वस्तू खरेदी करणे बंधनकारक नाही. मात्र, खरेदीसोबत रोख रक्कम काढल्यास खरेदीची रक्कम आणि काढलेली रोख रक्कम बिलावर स्वतंत्रपणे दाखवणे आवश्यक असेल.

जुन्या १७ परिपत्रकांना कात्री

आरबीआयने २००८ ते २०२२ या कालावधीत एटीएम आणि पीओएस व्यवहारांसंदर्भात जारी केलेली १७ जुनी परिपत्रके मागे घेतली आहेत. त्यांच्या जागी नवीन मास्टर निर्देश लागू करण्यात आले आहेत. हे नियम सार्वजनिक आणि खासगी बँका, ग्रामीण बँका, सहकारी बँका तसेच पेमेंट सिस्टम संस्थांना लागू असणार आहेत. त्यामुळे एटीएममधून पैसे काढणाऱ्या ग्राहकांना व्यवहारांची मर्यादा आणि त्यावरील शुल्क याबाबत अधिक स्पष्ट माहिती मिळणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!